गोंदिया : नाना पटोले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिल्याने इथे पोटनिवडणूक होणार आहे. बहुचर्चित भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार असून त्यासाठी त्यांनी आपला उमेदवारही निश्चित केला आहे. या पोटनिवडणुसाठी माजी आमदार मधुकर कुकडे हे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार असणार आहेत. ते आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीत उमेदवार निश्चितीसाठी काल (बुधवार) प्रफुल्ल पटेलांच्या उपस्थितीत बैठक पार पडली होती. त्यावेळी राष्ट्रवादीकडून विजय शिवनरकर यांचंही नाव चर्चेत होतं. पण अखेर मधुकर कुकडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. दरम्यान, भाजपकडून हेमंत पटेल आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यामुळे आता या जागी नेमकं कोण बाजी मारणार याकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.
नाना पटोले हे गेल्या काही दिवसांपासून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत भाजप आणि आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे आता त्या जागी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. नाना पटोले यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता.