भीमा कोरेगाव हिंसाचार: विशिष्ट संघटनेवर आरोप नाही- शरद पवार

0

पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी कोरेगाव भीमा हिंसाचार चौकशी आयोगासमोर आपले प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. आपण कोणत्याही एखाद्या विशिष्ट संस्थेवर आरोप करण्याचा परिस्थितीत नाही अशी माहिती त्यांनी या प्रतिज्ञापत्रात दिली आहे. 1 जानेवारी रोजी झालेल्या कोरेगाव भीमा हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला होता, तर अनेकजण जखमी झाले होते.

आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर करणारे शरद पवार पहिलेच राजकारणी आहेत. कोरेगाव भीमा हिसांचाराचा तपास करण्यासाठी चौकशी आयोग गठीत करण्यात आला असून यामध्ये दोघांचा समावेश आहे. कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जे एन पटेल आणि माजी राज्य सचिव सुमित मुलिक यांचा चौकशी आयोगात समावेश आहे. त्यांनी सर्व राजकीय पक्षांना पत्र लिहिले असून हिंसाचारासंबंधी त्यांच्याकडे असणारी माहिती प्रतिज्ञातपत्राद्वारे सादर करण्याचे आवाहन केले होते.

विशेष म्हणजे शरद पवार यांनी चौकशी आयोगासमोर मांडलेले म्हणणे हे हिंसाचारानंतर त्यांनी केलेल्या वक्तव्याच्या अगदी विरोधात आहे. शरद पवार यांनी हिंसाचारानंतर केलेल्या वक्तव्यात यामागे पुण्यातील काही हिंदू संघटनांची महत्त्वाची भूमिका असल्याचा दावा केला होता. त्यावेळी त्यांनी परिसरातील गावकऱ्यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे आपण हा दावा करत असल्याचे म्हटले होते.

शरद पवार यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात राज्य सरकारने कोरेगाव भीमामध्ये योग्य ती सुरक्षेची व्यवस्था केली नसल्याचा आरोप केला आहे.

याआधी शरद पवार यांच्या पक्षाने मात्र नेहमीच संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यामुळे हिंसाचार झाल्याचा आरोप करत कारवाई करण्याची मागणी केली आहे. मिलिंद एकबोटे यांना पोलिसांनी अटक केली होती. ते सध्या जामीनावर आहेत. तर संभाजी भिडे यांना कोणताही पुरावा नसल्याने अटक झालेली नाही.