पुणे – कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचारातल्या राहुल फटांगडे खून प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. सुरज रणजित शिंदे (२१) असे या आरोपीचे नाव असून तो पुणे जिल्ह्यातील दौंड येथे राहणारा आहे.
सीआयडीने नुकतेच याप्रकरणी चार मारेकऱ्यांचे व्हिडिओ आणि फोटो जाहीर केले होते. तसेच या मारेकऱ्यांची माहिती देण्याचे आवाहनही केले होते. त्यानंतर या चार पैकी एकाला चतुशृंगी पोलिसांनी अटक केली. आरोपी सुरजला सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथून अटक केली आहे तर इतर तिघांचा पोलीस शोध घेत आहेत.
१ जानेवारीला भीमा भीमा येथे हिंसाचार झालेला असताना पेरणे फाटा इथून दुचाकीने जाणाऱ्या राहुल बाबाजी फटांगडे (३०) या युवकाला जमावाने अडवले होते. राहुलने शिवाजी महाराजांचे जॅकेट घातलेले असल्याने त्याला लाठ्या काठ्या तसेच त्याच्या डोक्यात दगड घालून जबर मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी यापूर्वी तीन जणांना अटक केली आहे. तर सीआयडीने आणखी चार जणांचा व्हिडिओ आणि फोटो जाहीर केले होते. त्यातल्या एकाला अटक करण्यात यश आले आहे.