बीएचआरच्या अवसायकाविरोधात ‘धडकी भरो छत्री मोर्चा’

0

जळगाव – जळगावसह नाशिक, धुळे, नगर, नांदेड, मुंबई, पुणे आदी जिल्ह्यातील ठेवीदारांनी एकत्र येत बीएचआर पतसंस्था व पतसंस्थेचे अवसायक जितेंद्र कंडारे यांच्या विरोधात राज्यव्यापी ‘धडकी भरो छत्री मोर्चा’ काढला.
बीएचआर पतसंस्थेत राज्यभरातील शेकडो ठेवीदारांचा पैसा अडकला आहे. अनेक ठेवीदारांनी आपल्या आयुष्यभराची कमाई भविष्याची तरतूद म्हणून ठेव स्वरूपात बीएचआर पतसंस्थेत ठेवली होती. मात्र, पतसंस्थेच्या संचालकांनी आपले नातेवाईक, हितसंबंधातील लोकांना गैरप्रकारे बेहिशेबी कर्जवाटप केले. वाटप केलेल्या कर्जाची वसुली न झाल्यामुळे पतसंस्था अवसायनात गेली. त्यामुळे मुदतठेवींची मुदत पूर्ण होऊनही ठेवीदारांना आपले पैसे परत मिळाले नाहीत. दरम्यान, ठेवीदारांनी याप्रश्नी जनआंदोलन उभे केल्यानंतर सहकार विभागाने पतसंस्थेच्या मालमत्तांची लिलावाद्वारे विक्री करून ठेवीदारांचा पैसा परत देण्याचा मार्ग काढला आहे. परंतु, पतसंस्थेचे अवसायक जितेंद्र कंडारे हे साशंक पद्धतीने काम करत असल्याने आम्हाला ठेवी परत मिळत नसल्याचा आरोप ठेवीदारांनी केला आहे. ठेवी परत मिळाव्यात म्हणून वारंवार पाठपुरावा करूनही उपयोग होत नसल्याने शुक्रवारी राज्यभरातील ठेवीदार जळगावात एकत्र आले होते. शहरातील गांधी उद्यानापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर तेथे लाक्षणिक उपोषणाला सुरूवात करण्यात आली. जोपर्यंत आम्हाला ठेवी परत मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, असा इशारा यावेळी ठेवीदारांनी दिला.


अन्यथा दिल्ली गाठणार
बीएचआर पतसंस्थेच्या ठेवीदारांना त्यांच्या हक्काचा पैसा मिळाला नाही तर सर्व ठेवीदार १४ ऑगस्टला दिल्लीत जंतरमंतर मैदानावर तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडतील, अशी माहिती देखील यावेळी देण्यात आली. बीएचआर पतसंस्थेच्या मालमत्तांची लिलावाद्वारे विक्री करून ठेवीदारांचा पैसा परत करावा, पतसंस्थेचे अवसायक जितेंद्र कंडारे यांच्याकडून अवसायकपदाचा कार्यभार काढून घ्यावा, कंडारे यांची चौकशी करावी, अशा मागण्या ठेवीदारांनी केल्या आहेत.