अॅड. किर्ती पाटील यांच्या तक्रारीनंतर चौकशी अहवाल वरीष्ठांकडे रवाना
जळगाव – राज्यभरात गाजलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेसंदर्भात अॅड. किर्ती पाटील यांनी केंद्रीय मंत्री ना. राधामोहन सिंह यांच्याकडे चौकशीसंदर्भात तक्रार केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी करण्यात येऊन तसा अहवाल वरीष्ठांकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
जिल्ह्याच्या सहकाराचा स्वाहाकार होण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेच्या ठेवीदारांनी काही दिवसांपूर्वी अॅड. किर्ती पाटील यांची भेट घेऊन व्यथा मांडल्या होत्या. या व्यथा ऐकल्यानंतर अॅड. किर्ती पाटील यांनी बीएचआर पतसंस्थेचे अवसायक जितेंद्र कंडारे यांची भेट घेतली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान हे प्रकरण गंभीर असल्याने याबाबत अॅड. किर्ती पाटील यांनी केंद्रीय सहकार मंत्री ना. राधामोहन सिंह यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेला यासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले. मात्र या शाखेकडे बीएचआरसंदर्भात पुरेसे कागदपत्र नसल्याने ही चौकशी स्थानिक स्तरावरून करण्यासंदर्भात सहायक पोलीस आयुक्त किरण पाटील यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक यांना दि. २७ जुलै २०१८ रोजी पत्र देऊन स्थानिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी करण्यास सुचीत केले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने चौकशी करून अहवाल सुपूर्द केल्याची माहिती सुत्रांनी दिली.
बीएचआर पतसंस्थेसंदर्भात चौकशी केली असुन त्याबाबतचा अहवाल वरीष्ठ पातळीवर पाठविण्यात आला आहे. प्रत्यक्षात कागदपत्रे बघुन त्यावर सविस्तर बोलता येईल.
बापू रोहम
पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा
पुढील महिन्यात ४० पतसंस्थांचीही चौकशी
जिल्ह्यातील ४० पतसंस्थांच्या चेअरमनसह संचालकांवर आर्थिक गैरव्यवहाराचे गुन्हे विविध पोलिस ठाण्यात दाखल आहेत. त्यात मुख्यतः चंद्रकांत हरी बढे पतसंस्था, विठ्ठल रुख्माई पतसंस्था यासह चाळीस पतसंस्थांचा समावेश आहे, या संस्थांतील आर्थिक व्यवहाराची चौकशी आगामी महिन्यात सुरू केली जाईल. त्यासाठी पोलिसांसह सी.ए.ची एकत्रित बैठक घेतली जाईल अशी माहिती विशेष लेखा परीक्षक रावसाहेब जंगले पाटील यांनी दिली. शासकीय ऑडिट झाल्यानूसार या पतसंस्थांच्या संबंधितावर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. यात मोठे गैरव्यवहार झाल्याने ठेवीदारांना ठेवीच्या रक्कमा मिळत नाहीत. ठेवीदारांचा पैसा एकत्रितरीत्या मनिलॉड्रींग केला आहे. तो कशा प्रकारे झाला, त्याची चौकशीसाठी पोलिस, सहकार विभागाचे अधिकारी, विशेष लेखा विभागाचे अधिकारी याचे एक दिवसाचे प्रशिक्षण घेऊन या कारवाई कशी करायची याबाबत रूपरेषा ठरविली जाईल. त्यानंतर ऑडिट मध्ये निघालेल्या उणिवा यांच्या अनुषंगाने ही तपासणी होईल.