समर्थकांकडून भुजबळांचा रुग्णालयात सत्कार

0

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या सुटकेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र अजूनही ते केईएम रुग्णालयातच आहेत. पण भुजबळ समर्थक त्यांची आणखी वाट पाहू शकत नाहीत, असंच चित्र आहे. कारण भुजबळ समर्थकांनी आज रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी भुजबळांना बालाजीची शाल, नाशिकच्या बुधा हलवाईचे पेढे, मोठा हार घालून सत्कार केला.

भुजबळांच्या भेटीसाठी नाशिकमधील कार्यकर्ते हळूहळू मुंबईत दाखल होत आहेत. दरम्यान, छगन भुजबळ आज समर्थकांशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधणार असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र ते रद्द झालं आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी मनी लाँडरिंग कायद्याखाली छगन भुजबळ गेल्या दोन वर्षांपासून अटकेत होते. त्यांना शुक्रवारी 4 मे रोजी जामीन मंजूर झाला.

हायकोर्टाने त्यांना जामीन मंजूर केल्यानंतर त्यांची कागदोपत्री सुटका बाकी होती. अखेर ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. भुजबळ सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे ते आता डॉक्टरांच्या सल्ल्याने डिस्चार्ज घेऊन घरी जाऊ शकतात. त्यांना स्वादूपिंडाचा त्रास असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.