राजकीय ‘भुज’बळासाठी भेटी!

0

राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री भुजबळांच्या जामिनावर सुटकेनंतर राजकीय भेटी वाढल्या
विखेंनी घेतली भुजबळांची भेट तर आ.पंकज भुजबळ मातोश्रीवर

मुंबई (निलेश झालटे): राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या जामिनावर सुटकेनंतर राजकीय भेटीगाठी वाढत असल्याचे चिन्ह आहे. केईएम रूग्णालयात उपचार घेत असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळांची आज विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट घेवून त्यांच्या प्रकृतीची विचारपुस केली तर दुसरीकडे भुजबळ यांचे पुत्र पंकज हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर गेले. जामिनावर सुटका झालेले व सध्या केईएम रूग्णालयात उपचार घेत असलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या भेटीसाठी नाशिकचे कार्यकर्ते आणि समर्थकांनी धाव घेतली असतानाच आता राजकीय नेतेही त्यांच्या भेटीसाठी केईएम रूग्णालयात जाताना दिसत आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी भेट घेतली होती. त्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी रूग्णालयात जावून भुजबळांची भेट घेतली. यावेळी विखे यांनी भुजबळांना पुष्पगुच्छ देवून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

पंकज भेटले उद्धव ठाकरेंना
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र आ. पंकज भुजबळ हे मातोश्रीवर दाखल झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेवून चर्चा केली. शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून भुजबळांची बाजू घेण्यात आल्यानंतर आ.पंकज भुजबळांच्या मातोश्री भेटीमुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेत असताना भुजबळांच्या आक्रमक भूमिकेमुळे ते शिवसेना पक्ष प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जवळचे मानले जायचे. मात्र त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर शिवसेना आणि भुजबळ यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले. भुजबळांना जामिन मिळाल्यानंतर सामनातून भुजबळांची बाजू घेण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर भुजबळांचे पुत्र आ. पंकज भुजबळ यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी थेट मातोश्री गाठल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.

भुजबळांची काळजी घ्या!
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी छगन भुजबळ यांच्या तब्येतीची काळजी घ्या, असे पंकज यांना सांगितले. या भेटीमुळे भुजबळ आणि शिवसेनेची जवळीक वाढत आहे का,अशी चर्चा रंगू लागली आहे. तुरुंगातून जामिनावर सुटलेल्या छगन भुजबळ यांनीच पंकज भुजबळांना ‘मातोश्री’वर जाण्यास सांगितल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. उद्धव ठाकरे आणि पंकज भुजबळ यांची मातोश्री येथे सुमारे १५ मिनिट चर्चा झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांचे पीए मिलिंद नार्वेकरदेखील उपस्थित होते. विशेष म्हणजे भुजबळांच्या जामिनावर सुटकेनंतर शिवसेनेने ‘सामना’ या आपल्या मुखपत्रातून भुजबळांची बाजू घेतली होती. त्यातच आता पंकज भुजबळ मातोश्रीवर गेल्याने राजकीय वर्तुळात आणखी चर्चा रंगली आहे.

काय म्हटले होते सामनात!
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनात म्हटले होते की, भुजबळ हे शिवसेनेशी व शिवसेनाप्रमुखांशी वाईट वागले. महाराष्ट्र सदन उभारण्यात घोटाळा झाला नसल्याचे सत्य तेव्हा फक्त ‘सामना’नेच छापले. आम्ही वैयक्तिक वैर ठेवत नाही. भुजबळ सुटल्याने त्यांच्या कुटूंबीयांना नक्कीच आनंद झाला असेल. भुजबळांनी त्यांच्या प्रकृतीकडे जास्त लक्ष द्यायला हवे. ते जामिनावरच सुटले आहेत. याचे भान त्यांनी सदैव ठेवायला हवे. सुज्ञांस अधिक काय सांगावे! असेही सामनातील अग्रलेखातून शिवसेनेने म्हटले होते. ”भुजबळ शिवसेनेशी व शिवसेनाप्रमुखांशी वाईट वागले. भुजबळ हे राज्याचे गृहमंत्री असताना शिवसेनाप्रमुखांच्या अटकेसाठी त्यांनी जो आटापिटा केला होता त्याचे विस्मरण महाराष्ट्राला झालेले नाही. भुजबळांची अटक व तुरुंगवास हा त्यांच्यावर काळाने घेतलेला सूड ठरावा”,अशा बोचऱ्या शब्दांत उद्धव ठाकरेंनी भुजबळांवर टीका केली आहे.