भुसावळ नगरपरिषद नगराध्यक्ष यांच्यासह नऊ नगरसेवकांना न्यायालयाचा दिलासा
अपात्रतेचा निर्णय रद्द करण्याचा न्यायालयाचा निर्णय
भुसावळ | प्रतिनिधी |
भुसावळ : नगरपरिषदेच्या नगराध्यक्षासह नऊ नगरसेवकांवरील अपात्रतेची कारवाई रद्द करण्यात आली असून औरंगाबाद खंडपीठाने कारवाई स्थगित करण्याबाबतचा निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे भुसावळ नगरपरिषदेचे तत्कालीन नगराध्यक्ष यांच्यासह नऊ नगरसेवकांना दिलासा मिळाला आहे.
२०२१ साली आपला नगरसेवक पदाचा कार्यकाळ पूर्ण होण्यास काही दिवस शिल्लक असताना तत्कालीन सत्ताधारी भाजपा पक्षातील नगराध्यक्ष काही नगरसेवक यामध्ये, रमण भोळे, एड. बोधराज चौधरी, अमोल इंगळे, लक्ष्मी मकासरे, सविता मकासरे, प्रमोद नेमाडे, मेघा वाणी, किरण कोलते, शैलेजा नारखेडे यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार, आमदार एकनाथराव खडसे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्यावर पक्ष शिस्तभंगाची कारवाई म्हणून तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी सहा वर्ष निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्याबाबतची कारवाई केली होती. त्यानुसार संबंधित नगरसेवकांवर सहा वर्ष कालावधीसाठी अपात्रतेची टांगती तलवार होती. या निर्णयाविरोधात नगरसेवकांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावर आज खंडपीठाने सहा वर्षासाठीचा कारवाईचा निर्णय रद्द करून नगरसेवकांच्या बाजूने निर्णय दिला आहे. त्यामुळे संबंधित नगरसेवकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. नगरसेवकांच्या बाजूने ऍड. राजेंद्र देशमुख यांनी काम पाहिले.