भुसावळ- खडका गावाजवळील एमआयडीसीमध्ये असलेल्या पेपर मिलला सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने लाखो रुपयांचे पेपर व कच्चा माल जळून खाक झाला. आगीचे निश्चित कारण कळू शकले नसलेतरी यामागे शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा संशय व्यक्त होत आहे. सोहम पेपर मिलला सोमवारी दुपारी एक ते दिड वाजेच्या सुमारास आग लागली. सुरुवातीला कच्चा मालाला आग लागल्यानंतर आगीने रौद्र रूप धारण केल्याने भुसावळ पालिकेच्या चार बंबांनी तसेच नजीकच्या दीपनगर, ऑर्डनन्स फॅक्टरी तसेच सावदा पालिकेच्या बंबांना पाचारण करण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत आग आटोक्यात आलेली नव्हती. या आगीत लाखोंचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.