मागील काळात व्यापाऱ्यांना झालेला त्रास मोडून काढा
भुसावळला उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात आ. संजय सावकारे यांचे मत
भुसावळ प्रतिनिधी ।
बाजार समितीच्या निवडणुकीत विरोधकांनी जे उद्योग केले आहेत, त्यामुळे त्यांच्यासोबत कुणीही नाही. त्यांनी मतदारांना धनादेश दिले. तेदेखील अद्यापही वटलेले नाही, अशी मिश्कील टिका करत आगामी काळात शेतकऱ्यांच्या हातात सत्ता द्यायची आहे. सर्व उमेदवार आपले शेतकरी आहे. मागील काळात जो त्रास व्यापाऱ्यांना झाला तो मोडून काढायचा असल्याचे स्पष्ट मत आ. संजय सावकारे यांनी व्यक्त केले. भुसावळ शहरातील स्टार लॉनमध्ये शुक्रवारी रात्री झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.
माजी आमदार संतोष चौधरींचे नाव न घेतात्यांनी टिकेचे बाण चालवले. व्यासपीठावर खा.रक्षा खडसे, आ. राजूमामा भोळे यांच्यासह भाजपाचे उमेदवार उपस्थित होते. आ. सावकारे पुढे म्हणाले, बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकऱ्यांचे पॅनल उभे करण्यात आले आहे. त्यात कुटूंबातील कुणालाही उमेदवारी नाही. मेळाव्याला ८० टक्के मतदारांची उपस्थिती असल्याने विजय आपलाच होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आता मनमानी चालणार नाही : खा.रक्षा खडसे
आमदारांनी आपल्याला येथे मागील काळात काय – काय चुका झाल्या, त्याची कल्पना दिली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तसेच व्यापाऱ्यांना त्रास देण्याचे प्रकार झाले. शिवाय अनेक लोक बेरोजगार झाले. त्यामुळे ही मनमानी यापुढे आता चालणार नाही. आता मतदारांचीही जवाबदारी असणार आहे की त्यांनी चांगल्या उमेदवारांना निवडून द्यायला हवे. मार्केट कमेटीच्या माध्यमातून चांगले इन्फ्रास्ट्रक्चर उभे करता येईल. शिवाय कोल्ड स्टोरेजची व्यवस्था करता येईल. त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेत मालाला चांगला भाव मिळणे शक्य होईल, असेही खा. रक्षा खडसे म्हणाल्या.