पुणे पोलीसांची मोठी कारवाई, ५ कोटी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त
पुणे : पुणे पोलीस अन् कस्टम विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. साताऱ्यापासून पाठलाग करून मेथामाफेटामीन या अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या चारजणांना जेरबंद केले. ५ कोटी रुपये किंमतीचे एक किलो अंमली पदार्थ जप्त केल्याची माहिती कस्टम विभागाने दिली आहे.
२९ मे रोजी पुणे कस्टम विभागाच्या अंमली पदार्थ पथकास सातारा येथून मुंबईला मोठया प्रमाणात मेथाफेटामीन या अंमली पदार्थाची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, सातारा येथून आरोपींच्या फोर्ड एन्डेव्हर या गाडीचा पाठलाग केला. खेड शिवापूर टोलनाका येथे गाडी आली असताना, कस्टम पथकाने संबंधित गाडी पकडली. त्यावेळी गाडीत दोघेजण होते, त्यांच्या ताब्यातून सुरुवातीला ८५० ग्रॅम मेथामाफेटामीन मिळून आले.
परंतु त्यांचे आणखी दोन साथीदार लोणावळयात त्यांना भेटणार असून त्यांच्याकडेही अंमली पदार्थ आहेत, अशी माहिती मिळाली. त्यानुसार कस्टम पथकाने लोणावळा येथे जाऊन आणखी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडूनही २०० ग्रॅम अंमली पदार्थ जप्त केले आहे. आरोपी यापूर्वी कुरिअर कंपनीत कामास होते.