नवी दिल्ली-उत्साहाच्या भरात बरेचजण अशा काही घोषणा करतात ज्याचा कालांतराने अनेकांनाच विसर पडतो. अशीच एक घोषणा बॉलीवूडचे शहनशहा बिग बी अमिताभ बच्चन यांनी दहा वर्षांपूर्वी केली होती. उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे एका महाविद्यालयाच्या भूमिपूजनाच्या वेळी त्यांनी सहकुटुंब या कार्यक्रमाला हजेरी लावली. ज्यावेळी त्यांनी उपस्थित गावकऱ्यांना एक आश्वासन दिले. पण, कालांतराने मात्र त्यांना या आश्वासनाचा विसर पडला असावा. दौलतपूर येथे दहा वर्षांपूर्वी कन्या महाविद्यालयाच्या भूमिपूजनासाठी पोहोचलेल्या बिग बींनी या महाविद्यालयाला अनुसरुन काही आश्वासने दिली. इतकेच नव्हे, तर त्यांच्या सुनेच्या म्हणजेच अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या नावावरुनच या महाविद्यालयाचे नावही निश्चित करण्यात आले. पण, त्यानंतरच्या काळात मात्र बिग बींना त्यांच्या आश्वासनाचा विसर पडला.
दौलतपुर गावातील लोकांनीच या महाविद्यालयासाठी अनुदानातून निधी उभा केला. इतकेच नव्हे तर आता या महाविद्यालयाच्या बांधकामाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. जुलै महिन्यापासून हे महाविद्यालय सुरु करण्यात येणार असल्याचेही कळत आहे. त्यामुळे जे बिग बींना जमले नाही ते गावकऱ्यांनी आणि मुख्य म्हणजे गावातील एका शिक्षकाने करुन दाखवले अशीच प्रतिक्रिया सध्या अनेकजण देत आहेत.
सत्यवान शुक्ला नावाच्या या शिक्षकाने पुढाकार घेऊन महाविद्यालयाच्या बांधकामासाठी निधी गोळा केला. त्यासाठी लागणाऱ्या जमिनीचीही त्यांनीच तरतूद केली आणि हे काम मार्गी लावले. सध्या या महाविद्यालयाचं नाव दौलतपूर डिग्री कॉलेज असं ठेवण्यात आलं असून, डॉ. राम मनोहर लोहिया अवध विद्यापीठ फैजाबाद यांच्यातर्फे या महाविद्यालयाला मान्यताही मिळाली आहे. गावकऱ्यांना दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यात बिग बी अपयशी ठरल्यामुळे स्थानिकांचा त्यांच्यावर रोषही असल्याचं म्हटलं जात आहे. तेव्हा आता या सर्व प्रकरणी अमिताभ बच्चन काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.