रेशन दुकान नावावर करण्यासाठी 40 हजारांच्या लाचेची मागणी ः जिल्हा पुरवठा अधिकार्याची चौकशी
जळगाव – आजोबाच्या नावावरील रेशनचे दुकान वडीलांच्या नावावर करण्यासाठी तरुणाला 40 हजारांच्या लाचेची मागणी करुन पंटरमार्फत ती स्विकारणार्या जिल्हा पुरवठा विभागातील अव्वल कारकुन महिलांसह दोन खाजगी पंटरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुरवठा विभागात झालेल्या कारवाईने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांची चौकशी सुरु असून चौकशीत निष्पन्न झाल्यास त्यांनाही ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
तक्रारदार तरुणाला तीनदा परत फिरविले
भुसावळ शहरातील 25 वर्षीय तक्रारदार तरुणाच्या आजोबाच्या नावावर रेशन दुकान आहे. आजोबांच्या नावावरील दुकान वडीलांच्या नावावर कण्याासाठी तरुणाने जिल्हा पुरवठा विभागाचे कार्यालय गाठले. दुकान वडीलांच्या नावावर करण्याच्या मोबदल्यात पुरवठा विभागाच्या कार्यालयातील अव्वल कारकुन प्रमिला भानुदास नारखेडे वय-57 रा. भुसावळ, अव्वल कारकून पुनम अशोक खैरनार वय-37 या दोघा महिलांसह खाजगी पंटर असलेला हमाल कंत्राटदार प्रकाश त्र्यंबक पाटील, वय-55 रा-जाकीर हुसेन कॉलनी, संभाजी नगर, तरुणाला दुकान वडीलांच्या नावावर करुन देण्याच्या मोबदल्यात 40 हजारांच्या लाचेची मागणी केली. दि. 11, 12 व 13 हे दिवस तरुण संबंधित कामासाठी जळगावला आला. मात्र त्याच्याकडे कामाच्या मोबदल्यात पैशांची मागणी करण्यात आली. याबाबत तक्रारदार तरुणाने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार केली होती.
महिलांनी पंटरमार्फत स्विकारली लाच
तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे पडताळणी करण्यात आली. यात लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार मंगळवारी पोलीस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक निलेश लोधी, संजोग बच्छाव, सहा.पोलीस उपनिरीक्षक रविंद्र माळी, अशोक अहीरे, पोहेकॉ. सुरेश पाटील, सुनिल पाटील, मनोज जोशी, सुनिल शिरसाठ, जनार्दन चौधरी, प्रविण पाटील, नासिर देशमुख, महेश सुर्यवंशी, ईश्वर धनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा विभागात सापळा रचला. याठिकाणी मागणीनुसार पंटर योगेश नंदलाल जाधव वय 33 रा. गुजरात पेट्रोलपंप, जैन मंदिराजवळ जळगाव याने तक्रारदाराकडून 40 हजाराची रक्कम स्विकारताच पथकाने त्याच्यासह महिला व पंटरला ताब्यात घेतले.