नंदुरबार। ठेकेदाराने केलेल्या कामांच्या ८ कोटी ४५ लाखांच्या देयकापोटी ४३ लाख ७५ हजाराची लाच मागणार्या अक्कलकुवा येथील जि.प. उपअभियंता सुनीत दिगंबर पिंगळे, सहाय्यक अभियंता संजय बाबुराव हिरे व खाजगी पंटर अभिषेक सुभाष शर्मा यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. ठरलेल्या रकमेपैकी ४ लाखाचा पहिला हप्ता स्विकारतांना त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे
तक्रारदार हे शासकीय मान्यताप्राप्त व नोंदणीकृत बांधकाम ठेकेदार आहेत. तक्रारदारांना जिल्हा परीषद अंतर्गत अक्कलकुवा उपविभाग मार्फत भगदरी येथील गुरांच्या दवाखान्याची नवीन ईमारत बांधणे, रस्ता सुधारणा, रस्ता जलनिस्सारणाची कामे व ईतर ४५ कामांचे कार्यारंभ आदेश मिळाले होते.सर्व कामे तक्रारदारांनी पूर्ण केली आहेत. सदर कामांबाबत अक्कलकुवा येथील जि.प.उपविभागीय अभियंता सुनील दिगंबर पिंगळे (वय ४८ वर्ष), सहाय्यक अभियंता संजय बाबुराव हिरे, (वय ५२ वर्ष), यांनी तक्रारदारांचे एकूण ८ कोटी ४५ लाख ८९ हजार रुपये अंतिम देयके मान्य केली.यापैकी एकुण ७ कोटी ६१ लाख ८९ हजार रुपये एवढी रक्कम तक्रारदारांना प्राप्त झाली आहे. उर्वरीत ८४ लाख रुपये एवढी रक्कम संबंधीत अधिकार्यांनी यांनी राखून ठेऊन तक्रारदारांना मुद्दामहुन अनामत रक्कम राखून ठेवली असे सांगितले.र ८४ लाख रुपये मिळण्याकामी तक्रारदारांनी वेळोवेळी जि.प. बांधकाम उपविभाग कार्यालय अक्कलकुवा येथे उपअभियंता सुनील पिंगळे व सहाय्यक अभियंता एस. बी.हिरे यांना भेटून ऊर्वरीत देयकाची रक्कम मिळण्याबाबत विचारणा केली असता
त्यांनी आधी अदा केलेल्या देयकांच्या रकमेच्या मोबदल्यात तक्रारदारांकडून उप अभियंता सुनील पिंगळे यांनी ३० लाख ५० हजार रुपये व शाखा अभियंता एस.बी.हिरे यांनी १३ लाख २५ हजार रुपये अशी एकुण ४३ लाख ७५ हजार रुपये एवढ्या रकमेची मागणी केली.
तसेच मागणी केलेली रक्कम दिली नाही तर उर्वरित देयके तुम्हाला भेटू देणार नाही असे सांगीतले. तक्रारदारांनी अधिकार्यांना सदर रक्कम द्यावी याची हमी म्हणून तक्रारदारांकडून अधिकार्यांनी जळगाव जनता सहकारी बँक शाखा नंदुरबार या बँकेचे ३० लाख ५० हजार रुपयांचा धनादेश व १३ लाख २५ हजार रुपयांचा धनादेश असे दोन धनादेश दिनेश यादवराव सोनवणे या ओळखीच्या इसमाच्या नावाने लाचेपोटी लिहून घेऊन त्यांच्या ताब्यात ठेवले.
रोख रक्कम आणून दिल्यानंतर सदरचे दोन्ही धनादेश परत करून देऊ असे सांगितले होते. जि.प.बांधकाम उप अभियंता वर्ग-१ सुनील दिगंबर पिंगळे, जि.प. बांधकाम सहाय्यक अभियंता वर्ग-२ एस.बी.हिरे (दोन्ही नेमणुक जि.प. बांधकाम उपविभाग कार्यालय अक्कलकुवा) यांनी तक्रारदारांकडून ४३ लाख ७५ हजार लाचेची मागणी करून तडजोडीअंती प्रथम हप्ता टोकन रक्कम ४ लाख रुपये आज दि.२३ मार्च २०२२ रोजी पंच साक्षीदारांसमोर स्विकारली.
याप्रकरणी सुनील दिगंबर पिंगळे, संजय बाबुराव हिरे, खाजगी पंटर अभिषेक सुभाष शर्मा (वय ३२) यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे, पोलीस उपअधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक राकेश चौधरी, सहसापळा अधिकारी पोलीस निरीक्षक समाधान वाघ, पोलीस निरीक्षक माधवी वाघ,
पोहेकॉ उत्तम महाजन, पोहवा विलास पाटील, विजय ठाकरे, पोना अमोल मराठे, संदीप नावाडेकर, देवराम गावित, मपोना ज्योती पाटील, व चापोना जितेंद्र महाले यांच्या पथकाने केली