माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची मुख्यमंत्र्यांना मागणी
मुंबई : राज्य सरकारकडून करण्यात येत असलेल्या महाभरती प्रक्रियेत संभाव्य महाव्यापम घोटाळा होण्याची शक्यता असून राज्य शासनाने तातडीने उपाययोजना करून हा घोटाळा टाळावा अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, राज्यात नोकरभरतीची प्रक्रिया सुरु केली जाणार असून पहिल्या टप्प्यात ३६ हजार जागा भरण्याचे प्रस्तावित आहे. यापूर्वी सरकारी नोकरभरती एमकेसीएलकडून केली जात होती. राज्य शासनाने मागील काळात निर्माण केलेल्या या संस्थेची जगभरात ख्याती आहे. जगातील १३५ देशांत आणि देशातील अनेक राज्यांत एमकेसीएलतर्फे विश्वासार्हता सेवा पुरविली जाते. त्यांच्याकडे पायाभूत सोईंसह तज्ञ मनुष्यबळ असल्यामुळेच त्यांनी राज्यभर एकाचवेळी सहा लाख उमेदवारांची परीक्षा कोणत्याही गैरप्रकाराशिवाय घेतली होती. तरीही शासनाने एमकेसीएलची सेवा बंद करून ‘महाऑनलाईन’ हे वेबपोर्टल सुरु केले. टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस मार्फत ते चालवले जात होते. टीसीएस ही तशी नावाजलेली आणि विश्वासार्ह कंपनी आहे. मात्र तरीही शासनाने महाऑनलाईन सुद्धा तडकाफडकी बंद करून त्यांच्या जागी महापरीक्षा हे नवे वेबपोर्टल चालू केले.
या “महापरीक्षा” वेब पोर्टलसाठी आयटी विभागाने काढलेल्या निविदा अशा होत्या की कोणाला तरी हे काम द्यायचे, असे ठरवून त्या निविदा काढल्याचे निदर्शनास दिसून येते. म्हणून टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस काय किंवा आपटेक या नामवंत कंपन्यांनी निविदा भरल्या नाहीत. खरं तर टीसीएस कंपनी महाऑनलाईनचे काम व्यवस्थितपणे पाहत होती. कोणतीही नावाजलेली कंपनी निविदा भरत नाही, ही बाब गंभीर असूनही पुन्हा निविदा न काढता आयटी विभागाने ज्यांनी अर्ज केला त्यांच्या निविदा विचारात घेऊन कंत्राट दिले असे त्यांनी म्हटले आहे. निविदा भरणाऱ्यांत सिफी टेक्नॉलॉजी, टीआरएस फॉर्म्स अँड सर्व्हिसेस. युएस टेक्नॉलॉजी इंटरनॅशनल,आरसीयुएस इन्फोटेक. एनएसइआयटी लि., चाणक्य सॉफ्टवेअर सव्र्हिसेस यांनी निविदा भरल्या होत्या. यातल्या युएसटी इंटरनॅशनल -आरसीयुएस यांची निविदा आयटी विभागाने मंजूर केली.
युएसटी इंटरनॅशनल – आरसीयुएस या कंपन्यांनी गेल्या काही महिन्यापूर्वी एसटी,नगरपरिषदा कृषी व महसूल खात्यातील भरतीसाठी राज्यभरात परीक्षा घेतल्या होत्या. या परीक्षांमध्ये राज्यातील जिल्ह्याजिल्ह्यात प्रचंड गोंधळ व गैरप्रकार झाल्याने परीक्षार्थींनी हजारो तक्रारी नोंदविल्या. पण त्या तक्रारींची शासनाने दखल घेतली नाही. यामुळे संतप्त झालेल्या परीक्षार्थींनी आपल्या अन्यायाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पुणे ते मुंबई, असा “लाँग मार्च”ही काढला असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
शासनाकडून आता याच युएसटी इंटरनॅशनल – आरसीयुएस मार्फत महाभरती केली जाणार आहे. मध्यप्रदेश मधील नोकरभरतीत ‘व्यापम’ हा मोठा घोटाळा झाला होता. त्यात सुमारे ५२ जणांचे बळी गेले होते. राज्यातील महाभरतीसाठी सुद्धा मध्यप्रदेशातील कंपन्यांची निवड केल्याचे दिसून आहे. मध्यप्रदेश सरकारने व्यापम नोकरभरतीत ज्या कंपन्यांना काम दिले होते त्यात युएसटी इंटरनॅशनल ही कंपनी सुद्धा असल्याचे निदर्शनास आले आहे. तेव्हा महाराष्ट्र शासनाने नेमलेली युएसटी इंटरनॅशनल व व्यापम घोटाळ्यातील युएसटी इंटरनॅशनल एकच आहे का ? याचीही चौकशी करण्याची आवश्यकता असून तसेच व्यापमशी संबंधित कंपनीला काम दिले असल्यास हे काम कोणी दिले याबाबत न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
मध्यप्रदेशात व्यापम झाले आता महाराष्ट्रात महाभरतीच्या माध्यमातून महाव्यापम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील महाभरती एमकेसीएल मार्फत अथवा टीसीएसच्या महाऑनलाईन किंवा राज्यातील कुठल्याही निष्पक्षपातीपणाने काम करणाऱ्या संस्थेमार्फत करून महाभरतीमध्ये होणाऱ्या संभाव्य गैरप्रकारांना आळा घालण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
हे देखील वाचा
