पुणे : पुण्यातील हडपसर परिसरात पुणे पोलिसांनी नोटांनी भरलेल्या कोट्यवधींच्या बॅगा पकडल्या आहेत. पुण्यातील हडपसर परिसरात असलेल्या द्राक्ष संशोधन केंद्रजवळ पोलिसांनी गुन्हे शाखेच्या मदतीने ही कारवाई केली आहे. यावेळी पोलिसांनी नोटा मोजण्याच्या मशिन्स देखील जप्त केल्या आहेत. यावेळी पोलिसांनी एका ४० वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ३ कोटी ४२ लाख ६६ हजार २२० रुपयांच्या नोटा जप्त केल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रशांत धनपाल गांधी ( वय ४७) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सोमवारी रात्री साधारण साडेअकराच्या सुमारास हडपसर परिसरातील शेवाळेवाडी परिसरात असलेल्या द्राक्ष संशोधन केंद्राजवळ पोलिसांकडून संशयित वाहनाची तपासणी करण्यात येत होती. त्यावेळी पोलिसांना ब्रिझा गाडी क्र. एम एच १३ सी के २१११ एका व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटू लागल्या. त्यावर पोलिसांनी त्याला गाडी साइड घ्यायला लावून त्याच्या गाडीच्या डिकीची तपासणी केली. त्यावेळी त्या डिकीत काही बॅगा संशयास्पद रित्या आढळून आल्या. बॅग उघडून पाहिले असता त्यात नोटांचे बंडल यावेळी दिसून आले. त्यानंतर गाडीसह चालकाला पोलिस स्टेशन ला आणण्यात आले आहे.