। इस्लामाबाद
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांची अटक बेकायदेशीर ठरवली असून, त्यांची तात्काळ सुटका करण्याचे आदेश सरन्यायाधीशांनी दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने इम्रान खान यांना शुक्रवारी (१२ मे ) इस्लामाबाद उच्च न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे. यासोबतच त्यांना उच्च न्यायालयाचा निर्णय स्वीकारावा लागेल, असेही सांगितले आहे. सुटका झाल्यानंतर इम्रान खान यांनी आपल्याला लाठ्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला. इम्रान सरन्यायाधीशांना म्हणाले की, मला अजूनही कळत नाही की माझ्यासोबत असे का झाले..? कोर्टरुममधून माझे अपहरण करण्यात आले. मी वॉरंट मागितले, पण मला वॉरंट दाखवले गेले नाही. मला गुन्हेगारासारखे वागवले गेले. मला मारहाण झाली. आम्हाला निवडणुका हव्या आहेत, आम्ही राडा का करू ? त्यावर सरन्यायाधीशांनी राजकारणावर बोलू नका, असे त्यांना सांगितले. इम्रान खान यांच्या अटकेनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीनी एनएबीला फटकारले. तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने एनएबीने न्यायालयाचा अवमान केल्याचे मान्य केले.