दुचाकीचा अपघात पती ठार – पत्नी किरकोळ जख्मी
वरणगांव नजिकच्या महामार्गावरील घटना, देवदर्शन करून परततांना झाला अपघात
वरणगांव । प्रतिनिधी
चांगदेव ता. मुक्ताईनगर येथून देवदर्शन करून पती – पत्नी भुसावळला परत जात असतांना त्यांच्या दुचाकीचा अपघात होवून पती जागीच ठार तर पत्नी किरकोळ जख्मी झाल्या . हा अपघात शुक्रवारी ( दि .५ ) सकाळी १० वाजेच्या सुमारास वरणगांव नजिकच्या फुलगांव उड्डाण पुलाजवळ झाला .
भुसावळ येथील न्यु एरीया वार्डातील रहीवाशी ललीत प्रभाकर नेमाडे (संचालक – नवमहाराष्ट्र जनरल स्टोअर्स ) ( वय -४८) हे त्यांच्या पत्नी सौ. निता सह चांगदेव ता. मुक्ताईनगर येथील देवदर्शन करून भुसावळ येथे आपल्या दुचाकी क्रं. एम . एच .१९ / डि. एस .३३५६ ने परत जात होते . दरम्यान महामार्गावरील फुलगांव उड्डाण पुलाजवळ त्यांचा दुचाकीवरील अचानक ताबा सुटून दुचाकी दुभाजकावर धडकल्याने ललीत नेमाडे यांच्या डोक्याला जबर मार लागला यामध्ये त्यांचा जागीच मृत्यु झाला तर सौ . निता ह्या किरकोळ जख्मी झाल्याने त्यांनी मदतीसाठी आक्रोश केला. मात्र, भरवेगात असलेल्या वाहनधारकांनी याकडे दुर्लक्ष केले . तर याच मार्गावरून भुसावळला पत्नीसह जाणारे मनोज पंढरीनाथ ढाके यांनी मदतीचा हात देवून पोलीसांना घटनेची माहिती देत परीसरातील नागरीकांच्या मदतीने दोघांना वरणगांव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले . मात्र, ललीत नेमाडे यांचा मृत्यु झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगीतले . तर सौ . निता यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले . अपघाताच्या या घटनेची वरणगांव पोलीस ठाण्यात सौ . निता नेमाडे यांनी फिर्याद दिल्यावरून नोंद करण्यात आली आहे . तर ललीत नेमाडे यांच्या अपघाताचे वृत्त भुसावळात समजताच त्यांचे नातलग व मित्र परिवाराने वरणगांव ग्रामीण रूग्णालयात गर्दी केली होती .