मुक्ताईनगरात एसटी बसने दुचाकीला चिरडले : एकाचा जागीच मृत्यू
मुख्य रस्त्यावर होणारी वाहनांची अवैध पार्किंग बनली मृत्यूचा सापळा
मुक्ताईनगर प्रतिनिधी – बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मोटारसायकलिवरील चालकाचे नियंत्रण सुटले. काही कळायच्या आत मोटारसायकल बसच्या मागील चाकाखाली आली. या भीषण अपघातात मोटारसायकलस्वराचा जागीच मृत्यू झाला. अवजड वाहन रस्त्याच्या कडेला बेकायदेशीरित्या उभा असल्यामुळे हा अपघात झाल्याने संताप व्यक्त होत आहे. १३ ऑक्टोबर, शुक्रवारी सायकांळी ही दुर्दैवी घटना घडली.
शहरातील संत मुक्ताई महाविद्यालया समोर तालुक्यातील इच्छापूर किसन उर्फ कृष्णा तलवारे (वय-३४) आणि तुळशीराम वानखेडे हे मोटारसायकलीने बऱ्हाणपूर महामार्गावर असलेल्या संत मुक्ताबाई महाविद्यालयासमोरून जात होते. बसला ओव्हरटेक करीत असतानाच रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अवजड वाहनामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि बसच्या (एमएच-१०/डीएल-३५५५) मागील चाकाखाली मोटरसायकलीचा चेंदामेंदा झाला. या भिषण अपघातात किसन तलवारे या तरूणाचा जागीच मृत्यू झाला तर, सुदैवाने तुळशीराम वानखेडे बचावला. अपघाताची माहिती मिळताच मुक्ताईनगरातील स्थानिक पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उपजिल्हा ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आलेला आहे.
संत मुक्ताबाई महाविद्यालय, शासकीय विश्राम गृह, भारतीय स्टेट बँक, सेंट्रल बँक तसेच उपजिल्हा रुग्णालय मुख्य मार्गावरील काही हॉस्पिटल यांनी पार्किंगची व्यवस्थाच केली नसल्यामुळे मुक्ताईनगरातील नवीन संत मुक्ताई मंदिर ते बुऱ्हाणपूर रोडवरील मुस्लिम कब्रस्थान तसेच हिंदू स्मशानभूमी आणि प्रवर्तन चौक ते नवीन कोथळी पर्यंत भर रस्त्यात बेशिस्त वाहनाची पार्किंग सध्या डोकेदुखी ठरत आहे. बेशिस्त पार्किंगमुळे अनेकदा येथे वाहतुकीची कोंडी होत असते. तहसिलरोड वरील हॉस्पिटल समोर तर अनेकदा शासकीय अधिकारीच काय गंभीर रुग्ण असलेल्या रुग्णवाहिकांचा सुद्धा खोळंबा होत असतो. परंतु याकडे पोलिस आणि पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. परिणामी या परिसरात अपघातांची मालिकाच सुरु असून नागरिकांचा जीव टांगणीवर लागला आहे. या बेशिस्त पार्किंगचा बंदोबस्त कधी करणार ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.