जेफ बेझॉसच्या घटस्फोटामुळे बिल गेट्स पुन्हा ठरू शकतात सर्वात श्रीमंत व्यक्ती !

0

न्युयोर्क- अॅमेझॉनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझॉस यांनी २५ वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. पत्नी मॅकेन्झीपासून ते विभक्त होणार आहेत. जेफ बेझॉसचा हा जगातील सर्वात महागडा घटस्फोट ठरु शकतो तसेच या घटस्फोटाची प्रकिया झाल्यानंतर बिल गेट्स पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरु शकतात.

जेफ बेझॉस यांच्याकडे एकूण १३७ बिलियन डॉलर इतकी संपत्ती आहे. त्यात ८० मिलियन शेअर्सचा वाटा आहे. वॉशिंग्टन पोस्ट या वर्तमानपत्राची मालकी सुद्धा बेझॉस यांच्याकडे आहे. घटस्फोटानंतर बेझॉस आणि त्यांची पत्नी मॅकेन्झी यांच्यामध्ये संपत्ती वाटपाची प्रक्रिया खूप कठीण ठरु शकते.

या जोडप्याकडे ४ लाख एकरची मालमत्ता आहे. बेझॉस यांना चार मुले आहेत. घटस्फोटामुळे त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये मोठा फरक पडू शकतो. श्रीमंतांच्या जागतिक क्रमवारीमधील त्यांचे स्थान बदलू शकते. बेझॉस आणि मॅकेन्झी यांच्यामध्ये संपत्तीचे समान वाटप झाले तर मॅकेन्झी यांना ६९ बिलियनची संपत्ती मिळू शकते. ज्यामुळे त्या जगातील सर्वात श्रीमंत महिला ठरु शकतात. घटस्फोटानंतर संपत्तीची विभागणी झाली तर मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरु शकतात. त्यांच्याकडे सध्या ९२.५ बिलियन डॉलरची संपत्ती आहे.