भाजपच्या संग्रामसिंह देशमुखांनी मागे घेतला अर्ज
सांगली: काँग्रेसचे माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक पार पडत आहे. या जागेवर पतंगराव कदमांचे पुत्र विश्वाजीत कदम यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पलूस -कडेगाव पोटनिवडणूक आता बिनविरोध होणार आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. भाजपसह इतर अपक्षांनीही अंतिम क्षणी अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक आता बिनविरोध होणार आहे.
या जागेवर पतंगराव कदम यांचे वारसदार म्हणून काँग्रेसने विश्वजित कदम यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेस नेत्यांनी विश्वजित कदम यांना बिनविरोध निवडून आणण्याचे आवाहन सर्व पक्षांना विशेषतः भाजपला केले होते. मात्र तरीही भाजपने सुरुवातीला निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर करत संग्रामसिंह देशमुख यांना उमेदवारी दिली होती. पण आता महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनेही विश्वजित कदम यांना पाठिंबा जाहीर केला होता. आता भाजपनेही निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.