ज्येष्ठ हिंदुत्ववादी नेते मुरली मनोहर जोशींच्या अचानक ‘मातोश्री’ भेटीने मुंबईत चर्चेला उधाण!
हे देखील वाचा
मुंबई : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी यांनी बुधवारी अचानक मातोश्री निवास स्थानी जावून शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतल्याने चर्चाना आणि राजकीय तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत. सुमारे दोन तास या नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याने त्याला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. सेना भाजपच्या मैत्रिपूर्ण संबंधाना चालना देण्यासाठी भाजप कडून वरिष्ठ पातळीवर जोशी यांनी नव्याने चर्चा केल्याचे मानले जात आहे. अलिकडेच अकाली दलाने आगामी निवडणुकीत भाजपा सोबत न लढण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वी घेतल्याने भाजपाच्या कडून अन्य घटकपक्षांना राजी करण्याचे आणि मनधरणी करण्याचे जोरदार प्रयत्न नव्याने सुरू झाले असून जुन्या नेत्यांच्या माध्यमातून भाजपा जुन्या मित्राना सोबत घेण्याचा नवा प्रयत्न सुरू करत असल्याचेही सांगण्यात येत आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या अजेंड्याचे निर्वहन सध्या भाजपापेक्षा जास्त निष्ठापूर्वक शिवसेना करत असून काश्मीर पासून सध्याच्या सनातनच्या विषयावर उध्दव ठाकरे यांनी मोदी यांच्या विरोधात जाहीर भुमिका घेतल्याने हिंदुत्ववादी संघटनाना राजकीय शक्ती देण्यासाठी ठाकरे यांनी बाळासाहेबांप्रमाणे भुमिका घ्यावी आणि भाजपाच्या सध्याच्या नेत्यांनी विकासाच्या नावाखाली बाजूला ठेवलेल्या हिंदुत्वाच्या अजेंड्यांचा २०१९च्या निवडणुकीत जोरदार प्रचार करावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यासाठी जोशी यांनी व्यक्तिगत भेट असल्याचेही सांगण्यात येत आहे. सध्या सनातनच्या मुद्यावर हिंदुत्ववादी संघटनामध्ये उभी फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मालेगाव बॉम्बस्फोटाच्या प्रकरणानंतर नव्याने भाजपाच्या राज्यात हिंदू दहशतवादाचा मुद्दा पुन्हा समोर आला असून सध्याचे मोदी सरकार हिंदू संघटनाविरोधात कारवाई करत असल्याने हिंदुत्व वाद्यांची मोट बांधून सरकारच्या या नितीचा विरोध करण्यासाठी रणनीती तयार केली जात आहे, त्याचे नेतृत्व शिवसेनेने करावे, असा जोशी यांचा प्रयत्न असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.