भाजपचे पराग शहा ठरले सर्वात श्रीमंत उमेदवार !

0

मुंबई: माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना डच्चू देत भाजपने उमेदवारी पराग शाह यांना विधानसभेसाठी घाटकोपर पूर्व मतदारसंघातून तिकीट दिले आहे. काल पराग शहा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांनी संपत्ती जाहीर केली. यात पराग शाह यांची संपत्ती ५०० कोटी आहे. त्यामुळे ते राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहे.

पराग शहा यांनी निवडणूक अर्जासोबत त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीचे विवरण दिले आहे. ५० वर्षीय शाह यांनी व्यवसाय व गुंतवणूक हे आपल्या उत्पन्नाचे स्त्रोत म्हणून दाखवले आहेत. ते बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांच्या मालकीच्या दोन कंपन्या आहेत. मुंबईसह गुजरात व चेन्नईमध्ये त्यांचे बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये ७८ कोटींची स्थावर तर, ४२२ कोटींची जंगम मालमत्ता आहे. शाह पती-पत्नीच्या नावावर तब्बल २९९ कोटींचे शेअर्स आहेत. तर, व्यावसायिक, निवासी, कृषी व बिगरकृषी अशा १० स्थावर मालमत्ता आहेत. महाराष्ट्र व गुजरातमध्ये त्यांच्या नावे शेतजमीन आहे. त्यांच्याकडं २ कोटी ६ लाखाचे दागदागिने आहेत. ९ लाखांची स्कोडा कार आणि २ कोटी ४७ लाखांची फेरारी गाडी आहे.

शाह यांच्या खालोखाल भाजपचेच मुंबई अध्यक्ष व मलबार हिल मतदारसंघाचे उमेदवार मंगलप्रभात लोढा यांची संपत्ती सर्वाधिक आहे. त्यांच्याकडे ४४१ कोटींची संपत्ती आहे. तर, समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी २२० कोटींची संपत्ती घोषित केली आहे.