महाराष्ट्रात भाजप स्वबळावर सरकार स्थापन करू शकत नाही… शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांचे वक्तव्य

जालना : भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रावर स्वबळावर राज्य करू शकत नाही, असे मत शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबत युती करावी लागेल, असा दावा कीर्तिकर यांनी केला. गेल्या वर्षी पक्षात फूट पडल्याने शिवसेनेच्या मतांची विभागणी झाली, मात्र मतदारांचा विश्वास पुन्हा जिंकता येईल, असेही ते म्हणाले.

कीर्तीकर म्हणाले, ‘भाजप स्वतःच्या बळावर महाराष्ट्रावर राज्य करू शकला नाही आणि करू शकणार नाही. सत्ताधारी युतीची (शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भाजप) व्होटबँक असल्याने शिवसेनेशी युती करावी लागेल.

‘कोणताही पक्ष स्वबळावर सत्ता स्थापन करू शकत नाही’

मुंबईचे खासदार कीर्तिकर यांनी असाही दावा केला की, कोणताही एक पक्ष महाराष्ट्रावर स्वबळावर राज्य करू शकत नाही, मग तो भाजप असो, शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असो. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वबळावर सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही, असा दावा त्यांनी केला. ते लोकांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहेत, असे म्हणत शिवसेनेचे संसदीय पक्षनेते खासदार संजय राऊत यांची खिल्ली उडवली.