सांगली ।
आरक्षणाचे आश्वासन देत सरकार मराठा, धनगर आणि ओबीसींना खेळवण्याचे काम करीत आहे. जो भेटेल त्याला आरक्षण देतो, असे सांगून भाजप सर्वांना फसवत आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी मंगळवारी इस्लामपूरमध्ये केली. ओबीसी कार्यकत्यांचा मेळावा आज इस्लामपूरच्या राजारामबापू नाटयगृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी आ. पटोले यांनी भाजपवर घणाघाती टीका केली. यावेळी ते म्हणाले, जातनिहाय जनगणना व्हावी यासाठी काँग्रेसच्या अधिवेशनात सराव करण्यात आला असून यामुळे बहुजन समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी निधीची तरतूद करणे बंधनकारक असणार आहे. मात्र, भाजपला कोणालाच काही द्यायचे नाही. यामुळे जातनिहाय जनगणना टाळली जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच घटनेत यासाठी तरतूद केली आहे. समाजातील गरीब वर्गालाही प्रगतीची संधी मिळाली पाहिजे ही काँग्रेसची भूमिका आहे. नोटबंदीमुळे काळा पैसा येईल असे सरकारकडून सांगण्यात आले. मात्र, काळेधन आलेच नाही. ही केवळ शुध्द फसवणूक होती. तसेच जीएसटी म्हणजे सर्व सामान्य जनतेची लूट आहे. याला विरोध म्हणूनच आपण भाजपचा त्याग केला. ज्या मतावर आपण निवडून जाणार, त्यांचेच जर खिसे कापण्याचे उद्योग करू लागलो तर जनतेच्या प्रति आपले दायित्व काय? असेही पटोले म्हणाले.