कोलकाता: काल पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे भाजप अध्यक्ष अमित शहा यांचा रोड शो आयोजित करण्यात आला होता. या रोड शोमध्ये मोठा राडा झाला. यात वाहनांची जाळपोळ करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याने शेवटी पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. दरम्यान आज भाजपतर्फे या घटनेचा निषेध करण्यात आला असून भाजप नेत्यांनी बंगाल बचाव, लोकशाही बचाव अशी बॅनरबाजी करत मूक मोर्चा काढला. या आंदोलनात केंद्रीय मंत्री हर्ष वर्धन, जितेंद्र सिंह, विजय गोयल यांनी सहभाग घेतला.
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची हुकुमशाही असून त्यांच्याकडून लोकशाहीची हत्या केली जात असल्याचे आरोप भाजप नेत्यांनी केले आहे.
भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी देखील या घटनेचा निषेध केला आहे. आम्ही पश्चिम बंगालमध्येच नाही तर देशभरात निवडणूक लढत आहोत, पश्चिम बंगालमध्येच आम्हाला जास्त विरोध होत आहे. आमच्यावर हल्ले देखील होत आहेत. देशात इतर कोठेही आम्हाला हा अनुभव आलेला नाही. याला सर्वस्वी तृणमूल कॉंग्रेस जबाबदार आहे असे आरोप अमित शहा यांनी केले अआहे.