भाजपाकडून सर्व ११ जागांची तयारी

0

मुक्ताईनगरातुन ८ तर जळगावातुन २० जण ईच्छुक

जळगाव – राज्यात विधानसभा निवडणूकीसाठी युतीची निश्‍चीत मानली जात असली तरी भारतीय जनता पार्टीकडून आज जिल्ह्यातील सर्व ११ जागांसाठी मुलाखती घेण्यात आल्या. दरम्यान माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसेंसह मुक्ताईनगर मतदारसंघातुन ८ तर जळगाव शहर मतदारसंघातुन २० जण ईच्छुक असल्याची माहिती भाजपाच्या सुत्रांनी दिली.
भारतीय जनता पार्टीतर्फे आज विधानसभा निवडणुकीसाठी ईच्छुक उमेदवारांची मुलाखत प्रक्रिया बालाणी रिसॉर्ट येथे पार पडल्या. ऊर्जा राज्यमंत्री ना. मदन येरावार यांच्या उपस्थितीत मुलाखतींची प्रक्रिया पार पडली. यावेळी खासदार उन्मेष पाटील, जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील, संघटनमंत्री किशोर काळकर हे उपस्थित होते. लोकसभा निवडणूकीवेळी भाजपा आणि शिवसेनेचे युतीचे सुत्र ठरले होते. विधानसभा निवडणुकीसाठी अद्याप युतीची अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे भाजपाकडून जिल्ह्यातील सर्व ११ जागांची तयारी केली जात आहे. त्यासाठी मुलाखती देखिल घेण्यात आल्या. जिल्ह्यातील ११ जागांसाठी जवळपास १६४ ईच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली.


मुक्ताईनगरातुन आठ जण ईच्छुक
माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताईनगर मतदारसंघातुन यावेळेला आठ जण ईच्छुक असुन त्यांनी देखिल पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. तर रावेरमधुन १४, अमळनेर २२, चोपडा १२, भुसावळ ६, एरंडोल १०, जळगाव ग्रामीण १४, जळगाव शहर २०, पाचोरा २४, चाळीसगाव ३५, जामनेरातुन १ अशा एकुण १६४ जणांनी मुलाखती दिल्या. यात चाळीसगाव मतदारसंघातुन सर्वाधिक ३५ ईच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे.


युती न झाल्यास सर्व जागा लढणार
भाजपा आणि शिवसेनेची युती निश्‍चीत असली तरी अद्याप अधिकृत घोषणा नाही. त्यामुळे युती नाही झाली तर सर्व जागा लढविण्यासाठी आम्ही तयारी केली आहे. त्यामुळेच सर्व ११ जागांसाठी मुलाखती घेण्यात आल्या. युती झाल्यास जागा वाटपाचे सुत्र ज्याप्रमाणे ठरेल त्याप्रमाणे जागा लढविल्या जातील.
अ‍ॅड. किशोर काळकर
विभागीय संघटनमंत्री, भाजप