नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलनुसार पुन्हा देशात एनडीएची सरकार येणार असल्याचे दिसून येते. त्यामुळे भाजपात आनंदाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी उद्या मंगळवारी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. तसेच अमित शहांकडून एनडीएच्या नेत्यांना दिल्लीत भोजनासाठी येण्याचे निमंत्रण देण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भाजपकडून आता सत्तस्थापनेच्या हालचाली सुरु झाल्याचे दिसत आहे.
तर दुसरीकडे एक्झिट पोलच्या आकडेवारीमुळे विरोधकांच्या गोटात मात्र शांतता पसरली आहे. भाजपप्रणित एनडीएला यंदा बहुमताचा आकडा गाठता येणार नाही. परिणामी यंदा त्रिशंकू परिस्थिती निर्माण होईल, असा दावा विरोधकांकडून लोकसभा निवडणुकीपूर्वी केला जात होता. मात्र, एक्झिट पोलच्या आकडेवारीने विरोधकांच्या मनसुब्यांना सुरुंग लावला आहे. यानंतर विरोधकांनी तुर्तास वेट अँड वॉचची भूमिका घेतली असून सर्वजण २३ मे रोजी जाहीर होणाऱ्या निकालांकडे डोळे लावून बसले आहेत.