नवी दिल्ली- केंद्र सरकारने कोणत्याही संगणकीकृत यंत्रणांमध्ये हस्तक्षेप करण्याचे, देखरेख ठेवण्याचे आणि मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करण्यासाठी दहा तपास यंत्रणांना अधिकार दिले आहे. यावरून भाजपवर टीका होत आहे, असे असतांना खुद्द भाजपच्या आयटी सेलचीच वेबसाईट हॅक झाली आहे. निवडणुकांच्या तोंडावर आम्ही ब्लॅक मनी बाळगणाऱ्या भाजपा नेत्यांची नावे उघड करू, अशी धमकीही हॅकर्सनी दिली आहे.
व्यक्तिगत संगणकावर लक्ष ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने मागे घेण्यात यावा, असा संदेश यामाध्यमातून हॅकर्सनी दिला आहे.
भाजपाच्या आयटी सेलची वेबसाइट कोणी हॅक केली याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. ‘भाजपाच्या नेत्यांनी जेवढा काळा पैसा लपवून ठेवला आहे आम्ही त्या सर्वांची नावे सार्वजनिक करु. आमच्याकडे भाजपाच्या काळ्या पैशांबाबतचे पुरावे आहेत. खासगीपणा हा आमचा अधिकार आहे. त्यात हस्तक्षेप करु नका. नियम बदला अन्यथा देश सोडा आणि परिणामांना सामोरे जा’ अशी धमकी हॅकर्सकडून देण्यात आली आहे. मात्र, वेबसाइट हॅकर्सच्या तावडीतून काढून पूर्ववत करण्याचे काम आयटी सेलने तातडीने हाती घेतले आहे. तशाप्रकारचा संदेश आता वेबसाइटवर दिसत आहे.
False alarm! BJP IT cell has no website of its own. Our official website is just fine… pic.twitter.com/KTtdgceNsu
— Amit Malviya (@amitmalviya) December 22, 2018
भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालविय यांनी ट्विटरद्वारे भाजपाच्या आयटी सेलची अशी कोणतीही स्वतंत्र वेबसाईट नाही. भाजपाच्या सर्व वेबसाईट सुरक्षित असल्याचा दावा केला होता. पण एका ट्विटर युजरने नागपूरच्या आयटी सेलचे अध्यक्ष केतन मोहितकर यांच्या प्रोफाईलचा स्क्रीनशॉट काढून मालविय यांचा दावा चुकीचा असून खोटे बोलू नका असं सांगितलं आहे.