नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्य ममता बॅनर्जी यांचे वादग्रस्त छायाचित्र प्रसिद्ध केल्याने अटक करण्यात आलेल्या भाजपा नेत्या प्रियंका शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. प्रियंका शर्मा यांनी लेखी माफी मागावी, अशी अट ठेवण्यात आली आहे. त्यानंतर सशर्त जामीन मंजूर करण्यात आला. मात्र निकाल सुनावल्यानंतर न्यायमूर्तींनी प्रियंका शर्मा यांच्या वकिलांना बोलावून सशर्त जामिनाची अट रद्द केली, तसेच प्रियंका शर्मा यांना तत्काळ मुक्त करण्याचे आदेश दिले.
प्रियंका शर्मा यांनी ममता बँनर्जींचे मॉर्फ केलेले एक आक्षेपार्ह छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, प्रियंकाच्या जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. या जामीन अर्जावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने प्रियंका शर्मा यांनी या प्रकरणी माफी मागावी अशी अट घातली. प्रियंका शर्मा या एका राजकीय पक्षाच्या नेत्या आहेत. जर त्याना सामान्य नागरिक असत्या तर या प्रकरणी वेगळी अट चालली असती, असेही सर्वोच्च न्यायालयाने यावेळी नमूद केले. अखेरीस लेखी माफी मागण्याच्या अटीवर प्रियंका यांना जामीन मंजूर करण्यात आला. नंतर सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात सुधारणा करत सशर्त जामिनाची अट रद्द केली.