भाजपा नेत्याच्या मुलाच्या छळामुळे मुलीने शाळाच सोडली

0

लखनऊ-भाजपा नेत्याच्या मुलाने छळ केल्याने १२ वीतल्या मुलीने शाळाच सोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी या मुलीने पोलिसात तक्रार नोंदवली आहे. मात्र पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केली नाही असे या मुलीने म्हटले आहे. उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. भाजपा नेते संजय खोकर यांचा मुलगा १२ वीत शिकणाऱ्या मुलीला सातत्याने त्रास देतो आहे त्यामुळे या मुलीने १२ वीतून शिक्षण सोडून देण्याचा निर्णय घेतला आहे.

या मुलीच्या घरी संजय खोकर यांचा मुलगा रोज प्रेमपत्रे टाकून जातो. तसेच रस्त्यातही छेड काढतो असाही आरोप या मुलीने केला आहे. या मुलाच्या अशा वागणुकीमुळे मी आणि माझे आई बाब दहशतीत आहेत. हा भाजपा नेत्याचा मुलगा आहे त्यामुळे पोलीसही गप्प आहेत असेही या मुलीने म्हटले आहे. आम्ही तर आमच्या मुलीला घेऊन गाव सोडून जाण्याचा विचार करतो आहोत अशी प्रतिक्रिया या मुलीच्या आई वडिलांनी दिली आहे. दरम्यान आम्ही या सगळ्या प्रकरणाची दखल घेतली आहे. जो मुलगा या मुलीचा छळ करतो आहे त्याचाही शोध सुरु आहे असे पोलिसांनी म्हटले आहे.