भाजपाच्या बैठकीत कार्यकर्त्यांची संतप्त भावना
जळगाव – पक्षाने ज्यांना मोठे केले तेच आज पक्षामध्ये फूट पाडत आहेत. अशा फुट पाडणार्यांना विधानसभा निवडणूकीत उमेदवारी देऊ नका अशी संतप्त भावना कार्यकर्त्यांनी भाजपाच्या बैठकीत आज व्यक्त केली. दरम्यान याप्रसंगी काही कार्यकर्त्यांनी खासदार उन्मेष पाटील यांच्याविषयी देखिल नाराजी व्यक्त केली.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज भाजपाचे मंत्री ना. मदन येरावार यांच्या उपस्थितीत बालाणी रिसॉर्ट येथे इच्छुकांच्या मुलाखतीची प्रक्रिया पार पडली. यावेळी माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे, जिल्हा परीषद अध्यक्षा ना. उज्वला पाटील, जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील, खासदार उन्मेष पाटील, आमदार चंदूलाल पटेल, आमदार स्मिता वाघ, आमदार हरीभाऊ जावळे, प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, संघटनमंत्री किशोर काळकर, जि.प.चे सभापती पोपटतात्या भोळे, प्रा. सुनील नेवे, सदाशिव पाटील हे उपस्थित होते. मुलाखतींच्या आधी ना. येरावार यांनी जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी अमळनेरचे सुभाष अण्णा यांनी आपलेच लोक विरोधकांना पदे देत असल्याबाबत नाराजी व्यक्त केली. विरोधकांना पदे द्यायचीच असतील तर आम्ही कुणासाठी काम करावे? असा प्रश्न देखिल उपस्थित केला. चिंचोली येथे कार्यक्रमासाठी आलेल्या खासदार उन्मेष पाटील यांनी स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांना बोलावले नाही अशी तक्रार देखिल एका कार्यकर्त्याने ना. येरावार यांच्याकडे केली. तसेच पक्षात जे लोक फुट पाडत आहे त्यांना निवडणूकीत उमेदवारी देऊ नये अशी संतप्त भावना काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
सत्ता आणण्यासाठी १५ वर्ष लागले- ना. येरावार
सन १९९९ मध्ये गेलेली सत्ता आणण्यासाठी आपल्याला १५ वर्ष लागले. त्यामुळे आता सत्ता टिकविण्यासाठी जनतेपर्यंत योजना पोहचवुन काम करण्याची गरज असल्याचे ना. मदन येरावार यांनी सांगितले. आपल्या सर्वांच्या योगदानामुळेच आज देशात आणि राज्यात भाजपाची सत्ता आहे. आधीच्या आणि आताच्या राजकारणात मोठा फरक असल्याचे सांगत कुणीही कुणाला दुखावु नये असा सल्लाही ना. येरावार यांनी दिला.