जळगाव – गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबीत असलेला हुडकोच्या कर्जाचा प्रश्न हा आमच्यासाठी काश्मिरसारखाच होता. पण हा प्रश्न मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री ना. गिरीश महाजन, माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांच्यामुळे सुटुन जळगाव शहर कर्जमुक्त झाल्याचे आ.राजूमामा भोळे यांनी सभेत सांगितले.
महाजानादेश यात्रेनिमित्त सागर पार्क मैदानावर आयोजीत जाहीर सभेत प्रास्ताविक करतांना आ. राजूमामा पुढे म्हणाले की, जळगावकरांना मुख्यमंत्र्यांचे ऋण व्यक्त करण्याची संधी मिळाली आहे. ५ वर्षात ९०० कोटींचा निधी जळगाव शहराला मिळाला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे आभार आमदार भोळे यांनी व्यक्त केले. मनपा निवडणुकीच्या वेळी दिलेला शब्द भाजपने पूर्ण केला आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांचे मोठे सहकार्य लाभले. हुडकोच्या कर्जमुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांनी शासन निर्णय करून आम्हा जळगावकरांना न्याय दिला असल्याचे आमदार भोळे यांनी सांगितले. जिल्हा बँकेचेही कर्ज आम्ही फेडले आहे. आजपर्यंत मुख्यमंत्र्यांनी जळगावकरांना भरभरून दिले आहे. आता गाळ्याचा प्रश्न सोडवून मुख्यमंत्र्यांनी शहराच्या विकासाला गती द्यावी अशी मागणी आमदार राजूमामा भोळे यांनी केली.