भाजप खासदार, आमदार सरकारविरोधात करणार आंदोलन

0

लखनो-उत्तर प्रदेशमधील भाजपा खासदार रवींद्र कुशवाहा आणि आमदार सुरेंद्र सिंह यांनी आपल्याच सरकारविरोधात धरणे आंदोलनाची घोषणा केली आहे. सलेमपूरचे खासदार कुशवाहा यांनी आपल्या संसदीय क्षेत्रातील बिल्थरा रोड तेसच सलेमपूरमध्ये काही रेल्वेंना थांबा देण्याची मागणी करत संसदेच्या येत्या पावसाळी अधिवेशनादरम्यान संसदेतील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर धरणे धरण्याची घोषणा केली आहे. कुशवाहा यांनी आपल्यावर जनतेचा दबाव असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले.

 ५ जूनपासून आंदोलन

याप्रकरणी आपण रेल्वेमंत्री पियूष गोयल यांना आठ वेळा पत्र लिहिले आहे. संसदेच्या मागील सत्राच्या अखेरीस गोयल यांनी बोलावलेल्या बैठकीतही हा प्रश्न कुशवाहा यांनी उठवला होता. तरीही अद्याप काहीच होऊ शकलेले नाही. या विलंबामुळे सामान्य नागरिकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळेच आपण संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात गांधीजींच्या पुतळ्यासमोर धरणे धरण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे बैरिया येथील नेहमी चर्चेत असलेले भाजपा आमदार सुरेंद्र सिंह यांनीही राज्यातील योगी आदित्यनाथ सरकारविरोधात भूमिका घेतली आहे. बैरिया तहसील कार्यालय भ्रष्टाचाराने बरबटलेले असल्याचा आरोप करत येत्या ५ जूनपासून आंदोलन करणार असल्याची त्यांनीही घोषणा केली आहे.