कर्नाटकात भाजपची ती जागा पुन्हा वाढली !

0

बंगळुरु : हुबळी धारवाड मतदारसंघात मतमोजणीत तांत्रिक घोळ झाल्याने, या जागेचा निकाल रद्द करण्यात आला होता. मात्र पुन्हा त्याबाबतची खातरजमा केल्यानंतर, भाजपने जिंकलेली ही जागा त्यांच्याच पारड्यात पडली. जगदीश शेट्टर हे हुबळी धारवाडमधून भाजपचे विजयी उमेदवार आहेत. हुबळी धारवाडमधून जगदीश शेट्टर यांनी काँग्रेसच्या महेश नलवाड यांचा पराभव केला. जगदीश शेट्टर हे साल २०१२-१३  मध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री होते.

काय आहे प्रकरण?
हुबळी धारवाड मतदारसंघात इलेक्ट्रिक वोटिंग मशिन (ईव्हीएम) आणि व्हीव्हीपॅट स्लिप यांच्यातील मतांची संख्या वेगळी येत होती, त्यामुळे येथील निकाल रद्द करण्यात आला होता. जगदीश शेट्टर हे भाजपचे उमेदवार इथून विजयी झाले होते. त्यामुळे परिणामी भाजपच्या १०४ जागांमधून एक जागा कमी होऊन विजयी उमेदवारांची संख्या १०३ वर आली होती. मात्र अखेर घोळ निस्तरला आणि ती जागा पुन्हा भाजपच्या खात्यात जमा झाली.

हुबळी धारवाड मतदारसंघातील १३५ -अ या मतदान केंद्रात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधील मतांच्या आकडेवारीत फरक असला, तरी तो केवळ ४५९  मतांचा आहे आणि भाजपचे जगदीश शेट्टर हे संपूर्ण मतदारसंघातून २०  हजार मतांनी विजयी झाले आहेत. ४५९ मतं कमी केली, तरी शेट्टर हे विजयी ठरतात. त्यामुळे रिटर्निंग ऑफिसरनी जगदीश शेट्टर यांना विजयी घोषित केले आहे. आता कर्नाटकात भाजपच्या आमदारांची संख्या पुन्हा एकदा १०४  वर पोहचली आहे.