नवि दिल्ली: भाजपाचे अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी १३ आणि १४ जून रोजी नवी दिल्लीत बैठक बोलावली आहे. भाजपाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी कुणावर द्यावी, तसेच पक्षांतर्गत निवडणुकांवर शिक्कामोर्तब होणार असल्याची चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे.
या बैठकीबाबत पक्षाच्या एका जेष्ठ नेत्याच्या माहितीनुसार देशभरातील पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना बोलावण्यात आले आहे. राज्यातील भाजपमध्ये संघटनात्मक निवडणुकीवर शिक्का मोर्तब होणार असल्याची चर्चा आहे. भाजपाने आतापर्यंत राज्यांमधील निवडणूक झाल्यानंतर नेत्तृत्व बदल करत आला आहे. अमित शहा यांच्या जागेवर कुणाला घ्यावे याबाबत पक्षाने आपली अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही.
शहा यांना पर्याय म्हणून पक्षाध्यक्षपदासाठी माजी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांचे नाव पुढे आले आहे. मात्र, अमित शहा हेच अध्यक्षपदी कायम राहतील, अशीही पक्षात चर्चा आहे. त्यांच्या मदतीसाठी कार्याध्यक्ष निवडला जाईल असेही म्हटले जात आहे. गृहमंत्रालयाचा कारभार सांभाळताना अमित शहा यांना पक्षासाठी तितकासा वेळ देता येणार नाही, याच कारणासाठी नवा अध्यक्ष निवडण्याची आवश्यकता असल्याचाही एक मतप्रवाह पक्षात आहे.