मुंबई : देशातील पाच राज्यांमध्ये निवडणुका होत आहे. निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलेले असतांना राम मंदिर विवाद देखील डोके वर काढत आहे. याच पार्श्वभुमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा गुरुवारी मध्यरात्रीच अचानक मुंबईत दाखल झाले. शिवसेनेनेही तातडीची बैठक ठेवल्याने मुंबईतील राजकीय क्षेत्रामध्ये चर्चा रंगली आहे.
भाईंदरच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये संघाचे प्रशिक्षण वर्ग सुरु आहेत. आजचा शेवटचा दिवस आहे. यामुळे सरसंघचालक मोहन भागवत म्हाळगी प्रबोधिनीमध्ये आहेत. त्यांची भेट घेण्यासाठी भाजप अध्यक्ष अमित शहा अचानक मध्यरात्री मुंबईत दाखल झाल्याने राजकीय चर्चांना उधान आले आहे. म्हाळगी प्रबोधिनीमध्ये आज सकाळपासूनच शहा आणि भागवत यांच्यामध्ये चर्चा सुरु आहेत. यामध्ये पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि राम मंदिर प्रश्नावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकांत राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे. मध्यप्रदेशमध्ये काल भाजप उमेदवारांची यादी जाहीर करणार होते. मात्र, अचानक ही यादी रद्द करण्यात आली. यामध्ये विद्यमान 40 आमदारांना डच्चू देण्यात येणार असल्याचे समजते. भाजपशासित राज्य हातचे जाऊ नये यासाठी ही उमेदवार यादी आज जाहीर केली जाणार आहे. या पार्श्वभुमीवर शहा-भागवत यांच्यातील बराचवेळ चाललेली चर्चा सूचक इशारा करत आहे.