[व्हिडीओ] भाजप जिल्हाध्यक्ष व माजी आमदारामध्ये हाणामारी

0

दबंग गिरीश महाजनांमुळे वाचले माजी आमदाराचे प्राण

अमळनेरः येथील माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील यांना भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि त्यांच्या समर्थकांकडून मारहाण केल्याचा प्रकार आज अमळनेर येथील युतीच्या मेळाव्यात घडला. यावेळी व्यासपिठावर राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. त्यामुळे महाजन यांची भांडण सोडवितांना मोठी दमछाक झाली.

यासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात भाजपाचे जळगाव जिल्हाध्यक्ष उदय वाघ हे लाथांनी मारहाण करीत असल्याचे दिसत आहेत. खुद्द जिल्हाध्यक्षच हाणामारी करीत असल्याने त्यांच्या समर्थकांनीही मंचावर धाव घेत माजी आमदार बी. एस. पाटील यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यामुळे मेळाव्यात प्रचंड गोंधळ उडाला. हा गोंधळ पाहता जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी स्वतःचे प्राण धोक्यात घालत माजी आमदार पाटील यांचा जीव वाचविण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांना व्यासपीठावरून खाली ढकलले. यावेळी ते अन्य कार्यकर्त्यांनाही दूर करताना दिसत आहेत. या हाणामारीत ना. महाजन यांनी तत्परता दाखविली नसती, तर मेळाव्यातच अघटित घडण्याची शक्यता होती.