मुंबई: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भाजपाला सत्ता स्थापन करण्याचे निमंत्रण दिले आहे. या निर्णयाचे शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी स्वागत केले असून, भाजपाला शुभेच्छा दिल्या आहेत. सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर स्वतःहून सत्तास्थापनेचा दावा करणे ही या देशाच्या राजकारणाची परंपरा आहे. आता राज्यपालांनी निमंत्रण दिल्यानंतर तरी सत्तास्थापन करुन बहुमत सिद्ध करावं, असे आवाहन संजय राऊत यांनी केलं.
शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय बहुमत सिद्ध करता येणार नाही हे शिवसेनाही ओळखून आहे. त्यामुळेच भाजपने बहुमत सिद्ध करुन दाखवावे असे आव्हान वारंवार शिवसेना देत आहे. भाजपने सत्तास्थापनेसाठी थांबण्याची गरज नव्हती. पुढच्या २४ तासात त्यांनी सत्तास्थापन करायला हवी. राज्यपालांच्या पुढाकारानेच राज्याला नवे सरकार मिळू शकेल. राज्यपालांनी दिलेल्या संधीचा तरी भाजपने लाभ घ्यावा, असेही संजय राऊत म्हणाले. राज्यात मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होईल, हे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.
भाजपचा भ्रमाचा भोपळा फुटला असल्याचा घणाघातही संजय राऊत यांनी केला. कुणाचेही आमदार फुटणार नसल्याचं ते म्हणाले. शिवसेनेचे आमदार सध्या मुंबईतील मालाडमधील हॉटेल रिट्रीटमध्ये आहेत. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मध्यरात्री सर्व आमदारांशी चर्चा केली आणि हॉटेलमध्येच मुक्कामही केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही आमदारांना भेटण्याची शक्यता आहे.