भाजपला हवे मावळ, शिरुर, तर राष्ट्रवादीला पुणे! 

0

पुणे : मावळ व शिरुर लोकसभा मतदारसंघावर सत्ताधारी भाजपने दावा सांगितला असून, त्यामुळे युती झालीच तर मोठा राजकीय पेचप्रसंग तयार होणार आहे. मावळमधून शिवसेनेचे श्रीरंग बारणे तर शिरुरमधून शिवाजीराव आढळराव पाटील हे उमेदवार आहेत. दुसरीकडे, पुण्याच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा सांगितला असून, ही जागा काँग्रेसची आहे. परंतु, काँग्रेसच्या उमेदवाराला येथे पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे शहरात वाढलेली राष्ट्रवादीची ताकद पाहाता, ही जागा अजित पवारांनी राष्ट्रवादीला मागितली आहे. भाजपसोबत युतीस शिवसेनेने नकार दिला असला तरी काँग्रेस व राष्ट्रवादीने आघाडीला हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे पुण्यातील जागेवरून आघाडीत बिघाडी होते की काय? असा प्रश्न निर्माण झालेला आहे.

भाजपचे उमेदवार!
मावळ व शिरुर लोकसभा मतदारसंघात भाजपचे आमदार जास्त असून, स्थानिक स्वराज्य संस्थांतही प्राबल्य आहे. त्यामुळे या मतदारसंघावर भाजपने दावा सांगितला आहे. पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांनी युती होवो अथवा न होवो मावळ व शिरुर मतदारसंघातून भाजपचे खासदारच निवडून येतील, असे नुकतेच सांगितले होते. त्यानंतर शिवसेनेनेदेखील तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

भोसरीचा भाग

शिरुर लोकसभा मतदारसंघात ग्रामीण भागासह पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरीचा भाग येतो. या भागावर भाजपचे सहयोगी आमदार महेश लांडगे यांचे वर्चस्व आहे. तसेच, ग्रामीण भागातही त्यांचे नात्यागोत्याचे जाळे मोठे आहे. त्यामुळे शिरुर मतदारसंघातून आ. लांडगे हे इच्छूक असून, तशी त्यांनी जोरदार तयारी चालवलेली आहे. तसेच, मावळ मतदारसंघातही पिंपरी-चिंचवडचा मोठा भाग समाविष्ट आहे. या भागातून मोठे मतदान असल्याने मावळचा खासदार हा भागच ठरवित असतो. या भागावर आ. लक्ष्मण जगताप यांनी जोरदार राजकीय पकड निर्माण केलेली आहे. त्यामुळे मावळमधून आ. जगताप हे स्वतः मैदानात उतरण्यास इच्छुक आहेत. त्यांच्याविरोधात खा. बारणे यांना पुन्हा उमेदवारी मिळते की शिवसेना उमेदवार बदलते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. गतवेळेस आ. जगताप यांनी खा. बारणे यांच्याकडून पराभव स्वीकारलेला आहे.

पुण्यात भाजप, राष्ट्रवादीच प्रबळ!
पुण्याची जागा काँग्रेसकडे असली तरी, त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसने दावा सांगितलेला आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसने विश्वजित कदम यांना उमेदवारी दिली होती. तर त्यांच्याविरोधात भाजपने अनिल शिरोळे यांना उभे केले होते. त्यात जवळपास तीन लाख मतांच्या फरकाने शिरोळे हे विजयी झाले होते. तत्पूर्वी 2009च्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सुरेश कलमाडी यांनी शिरोळे यांचा पराभव केलेला होता. परंतु, राष्ट्रकुल घोटाळ्यात बदनाम कलमाडींना उमेदवारी देण्यास काँग्रेसने नकार दिला होता. आता या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आग्रह धरला असून, खासदारकीसाठी पालकमंत्री गिरीश बापट हेदेखील इच्छुक आहेत. त्यामुळे काँग्रेस ही जागा राष्ट्रवादीला सोडते का? हे पाहणेदेखील औत्सुक्याचे ठरणार आहे. शहरात भाजप अन् राष्ट्रवादीची राजकीय ताकद ही काँग्रेसपेक्षा अधिक आहे. तसेच, भाजपविरोधात प्रबळ उमेदवारही काँग्रेसकडे नाही, अशी वस्तुस्थिती आहे.