भारतीय जनता पक्षाने लोकसभा, विधानसभा व नगरपालिकांमधील दणदणीत विजयाची मालिका कायम राखत जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्येही यश संपादन केले आहे. जिल्हा परिषदेत भाजपला सर्वाधीक 33 जागा मिळाल्या असून स्पष्ट बहुमतासाठी या पक्षाला अवघ्या एका जागेची आवश्यकता भासणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला 16, शिवसेनेला 13 तर काँग्रेसला चार जागांवर समाधान मानावे लागले आहे. जिल्हा परिषदेत गेल्या दोन दशकांपासून भाजप व शिवसेनेची युती सत्तेत असतांना आता भाजपला जवळपास स्पष्ट बहुमत मिळाल्याने युती होणार का? याबाबत प्रचंड उत्सुकता लागून आहे. दरम्यान, जिल्ह्यातील बहुतांश पंचायत समित्यांवरही भाजपचाच झेंडा फडकणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. भाजपला रावेर लोकसभा मतदारसंघात लक्षणीय यश लाभले आहे. चोपडा, यावल, रावेर, जामनेर, बोदवड आणि मुक्ताईनगरमध्ये भाजपला यश मिळाले असले तरी भुसावळ तालुक्यात मात्र अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.
जिल्ह्यातील जिल्हा परीषद व पंचायत समिती निवडणुकासाठी बुधवार 16 फेब्रुवारी रोजी मतदान घेण्यात आले होते. आज तालुकापातळीवर सकाळी 10 वाजेच्या सुमारास मतमोजणीला सुरूवात करण्यात आली. साधारण दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास मतमोजणी संपून निकाल जाहिर करण्यात आला. यात जळगाव तालुक्यातील 5 गटांमध्ये भाजपा 2, राष्ट्रवादी 2 तर शिवसेना 1; चोपडा तालुक्यातील 6 गटांमध्ये भाजपा 3, राष्ट्रवादी व शिवसेना प्रत्येकी 1; यावलमध्ये 5 गटांपैकी भाजपा 3 तर काँग्रेसला 2 जागा मिळाल्या. रावेरमध्ये 6 गटातून भाजपा 4, राष्ट्रवादी आणि काँग्रेस 1, मुक्ताईनगर तालुक्यातील 4 गटासाठीच्या चार तर बोदवड दोन गटासाठीच्या दोन्ही जागांवर भाजपाने बाजी मारली. भुसावळच्या तीन गटांपैकी भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना प्रत्येकी एक जागा मिळाल्या आहे. जळगाव तालुक्यात 5 गटांमधून भाजपा 2, राष्ट्रवादी 2 आणि शिवसेना 1 अशा जागा काबिज केल्या. धरणगावच्या तीन गटातून भाजपा एक आणि शिवसेना 2; अमळनेरच्या 4 गटातून भाजपा व राष्ट्रवादी प्रत्येकी दोन जागा मिळविल्या आहेत. पारोळा तालुक्याच्या 4 गटासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना प्रत्येकी दोन जागांवर विजय मिळवला आहे. एरंडोलच्या तीन गटातून भाजपा 1 आणि शिवसेना 2, जामनेर तालुक्यातील 7 गटातून भाजपाला 5 जागा तर राष्ट्रवादीला दोन जागा मिळाल्या आहे. पाचोर्यातून भाजपा 2 तर शिवसेना 3 जागा तर भडगावमध्ये राष्ट्रवादी 1 आणि शिवसेना 2 अश्या जागांवर समाधान मानावे लागले. आणि चाळीसगाव तालुक्यातील 7 गटांपैकी भाजपाला 3 राष्ट्रवादीला 4 याप्रमाणे जागा मिळविल्या आहे. जिल्हा परीषदेच्या गटासाठी भाजपाला 67 जागांपैकी 33 जागांवर विजय मिळाला आहे. मात्र भाजपला पारोळा आणि भडगाव येथे खाते उघडता आले नाही तर शिवसेनेला चोपडा, भुसावळ, जळगाव तालुक्यात प्रत्येकी 1, धरणगाव, पारोळा, एरंडोल आणि भडगाव तालुक्यात 2 तर पाचोरा 3 असे एकुण 14 जागांवर विजय मिळविला आहे. दुसरीकडे काँग्रेसने चोपडा, यावल आणि रावेर मिळून 4 जि.प. गटात जागा मिळविल्या आहे.
Web Title: BJP won in ZP Jalgaon