मंगलोर – ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या कर्नाटक विधानसभेच्या वार्तांकनादरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी व्यत्यय आणल्याचा प्रकार घडला आहे. सरदेसाई हे रविवारी नेहरू मैदानावरील भाजपच्या सभेचे वार्तांकन करत होते. याआधी देखील वेगवेगळ्या ठिकाणी भाजप समर्थकांकडून सरदेसाई यांना अशाच पद्धतीने लक्ष्य केल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रविवारी नेहरू मैदानावर सभा असल्याने माध्यमांचे अनेक पत्रकार वार्तांकनासाठी येथे दाखल झाले आहेत. या पार्श्वभुमीवर पत्रकार राजदीप सरदेसाई देखील उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असताना काही भाजप कार्यकर्त्यां आक्रमक होत राजदीप यांच्या कामात व्यत्यय आणला.
कार्यकर्त्यांच्या मोदी, मोदी अशा घोषणा सुरू असतानाही राजदीप सरदेसाई यांनी आपले वार्तांकनाचे काम सुरुच ठेवले. अशा विरोधाच्या परिस्थितीत देखील सरदेसाई यांनी जवळजवळ १ तास आपले काम केले. पंतप्रधान मोदी यांच्या सभेच्या ठिकाणी आल्यानंतरदेखील संबंधित कार्यकर्त्यांनी हा प्रकार सुरुच ठेवला होता.
मोदी यांनी बोलायला सुरुवात केल्यानंतर सरदेसाई यांनी आपले वार्तांकन थांबवले. पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मोदी सरकारला अनेक अडचणीचे प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांकडून हेतू पुरस्कर त्यांच्या कामात अडथळे निर्माण केले जात असल्याचे मत विरोधक व्यक्त करत आहेत.