बोंडअळी, तुडतुड्या पिडीत शेतकऱ्यांना साडेतीन हजार कोटींची मदत 

0
शेतकऱ्यांना मोठा दिलासा, तीन टप्प्यात मिळणार मदत
मुंबई (निलेश झालटे):  राज्यात गुलाबी बोंडअळी आणि धान पिकावरील तुडतुडे रोगाच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीपोटी  शेतकऱ्यांना 3 हजार 400 कोटींची मदत जाहीर केली आहे. यंदाच्या खरीप हंगामात बोंडअळी आणि तुडतुडे रोगाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारने मदतीचा हात दिला आहे.  राज्यात गुलाबी बोंडअळीमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. राज्य सरकारच्या प्राथमिक पाहणीनुसार ४३ लाख हेक्टर लागवडीपैकी सुमारे ३३ ते ३४ लाख हेक्टरवरील कापसाचे पीक बाधित झाल्याचा अंदाज आहे.
आता या शेतकऱ्यांना 3 हजार 400 कोटींची देण्याबाबातचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. तीन समान हप्त्यात ही मदत शेतकऱ्यांना वितरित केली जाणार आहे.गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात कापसाला बोंड अळी लागल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. त्यातच विषारी किटक नाशक फवारणीमुळे सुमारे 30 पेक्षा जास्त शेतकरी आणि शेतमजुरांचा मृत्यू झाला होता. दुसरीकडे धान पिकाला तुडतुडे रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने विदर्भातील शेतक-यांना मोठा फटका बसला होता. विरोधकांनी हा मुद्दा लावून धरत, नुकसान भरपाईची मागणी केली होती. कापूस किंवा धानाचे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ही मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
पंचनाम्यानुसार निश्चित करण्यात आलेले ३३ टक्के पेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरआच्या दरानुसार मदत देण्याचा निर्णय १७ मार्च २०१८ रोजी घेतला होता. तसेच त्यापोटी केंद्र सरकारला ३,३७३ कोटी रुपयांचे मदतीचा प्रस्ताव पाठवण्यात येत असल्याचे महसूल मंत्र्यांनी मागील अधिवेशनात सांगितले होते. एनडीआरएफच्या निकषांनुसार पिकांच्या नुकसानीपोटी कोरडवाहू क्षेत्राला हेक्टरी ६,८०० रुपये, बागायती क्षेत्राला हेक्टरी १३,५०० रुपये आणि बहुवार्षिक फळपिकांना हेक्टरी १८,००० रुपये मदत देय आहे.