शिरपूर प्रतिनिधी ।
वडिलोपार्जित शेतजमिनिवरील सोद व ७/१२ उताऱ्यावर विहिरीची चुकीची झालेली नोंद कमी करण्यासाठी शेतकऱ्यांकडून राहत्या घरी १० हजारांची लाच घेताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने बोराडी मंडळ अधिकाऱ्यास आज मंगळवारी दुपारी साथ पकवले. सदरच्या कारवाईने शिरपूर महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. अशोक चिंधू गुजर असे कारवाई करण्यात आलेल्या संशयीत मंडळ अधिकाऱ्याचे नाव आहे. तक्रारदाराची वकवाड शिवारात वडिलोपार्जित शेतजमीन असून शेतात विहीर नसताना जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर चुकीने विहीर असल्याची नोंद झाली होती. ती फेरफार नोंद रद्द करण्यासाठी व यापूर्वी हक्कसोड केल्याच्या बदल्यात मंडळ अधिकारी अशोक गुजर यांनी तक्रारदाराकडे १५ हजारांची लाच मागितली होती. मात्र तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. दाखल तक्रारीची अधीक्षक अनिल बडगुजर यांनी शहानिशा करून पथकाने मंगळवारी दुपारी शहरातील मिलिंदनगर येथील संशयिताच्या राहत्या घराजवळ सापळा रचला. दरम्यान तक्रारदाराकडून तडजोडीची १० हजारांची लाच घेताना पथकाने त्यास रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची कारवाई सुरू आहे. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.