महिलांसंबंधी उच्च न्यायालयाने घेतला महत्वपूर्ण निर्णय

0

मुंबई- लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलांबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. एक विवाहित महिला परपुरूषासोत 15 वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती, तिला पोटगीचा हक्क असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल नुकताच मुंबई उच्च न्यायालयानं दिला आहे. पोटगीसाठी या महिलेने केलेला दावा सत्र न्यायालयानं फेटाळला होता, मात्र हायकोर्टानं सत्र न्यायालयाचा निकाल बाजुला ठेवत या महिलेला पोटगी मिळायला हवी असा निकाल दिला आहे. घरगुती हिंसाचाराचा संबंध व त्यासंदर्भातील कायदेशीर लाभाचा विचार करताना या जोडप्याचे संबंध विवाहासारखेच होते असा निष्कर्ष न्यायालयाने काढला आहे.

टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार न्यायाधीश भारती डांगरे यांनी घरामध्ये महिलांवर होणाऱ्या हिंसेसंदर्भात हा निकाल दिला आहे. सदर महिलेचा दावा होता की, ती या पुरूषाबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये गेली 15 वर्षे राहत होती, त्याच्या बरोबर पत्नीसारखे सगळे खर्च भागवत होती आणि तिची पहिल्या पतीपासून झालेली मुलंही त्याला वडिल संबोधित होती. समाजासाठी या जोडप्यानं पती-पत्नीसारखं वर्तन निभावलं आहे, एवढंच नाही तर ते उद्योगधंदाही एकत्र करत होते, असं न्यायालयानं नमूद केलं आहे.