साक्री तालुक्यात बोरा एवढी गार

धुळे | धुळे जिल्ह्याला गारपिटीचा मोठा तडाखा बसलाय. मागील दोन दिवस अवकाळी पाऊस सुरु होता पण रविवारी गारपिटीचा तडाखा बसल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालंय. धुळ्यातील खोरी टिटने भागात मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने निसर्गाच्या अवकृपेने पुन्हा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलंय. मागील काही दिवसांपासून शेतमालाला हमीभाव द्या, अशी मागणी शेतकरी करत होता. आता तर हातातोंडाशी आलेलं पीकच पावसाने हिरावून नेले.
रब्बी हंगामातील पीके काढणीला आली असतानाच निसर्गाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिसकावला आहे. सोमवारी सायंकाळी ४ च्या सुमारास झालेला अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे गहू, हरभरा, मका पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे आता शेतकरी अडचणीत सापडला आहे.
आज सायंकाळी साक्री तालुक्यातील मूळमाया परिसरातील निजामपूर जैताणे, खोरी टिटाणेसह परिसरात सर्वत्र बोराच्या आकाराएवढ्या गारा पडल्या. त्यामुळे महामार्गावरील रहदारी काही वेळाकरिता थांबली. तर गहू, हरभरा, मका आदी पिके काढणीवर आलेली असताना अवकाळी पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अचानक आलेल्या पावसामुळे पिकांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. हाता-तोंडाशी आलेला घास लहरी पावसाने हिसकावला आहे.

साक्री तालुक्यात काही ठिकाणी गहू काढणी सुरू झाली होती तर बहुतांश शेतकऱ्यांनी गुरांचा चारा शेतात ठेवलेला होता. अचानक आलेल्या पावसामुळे चारा वाचवताना त्यांना मोठी कसरत करावी लागली. शेतकऱ्यांनी कसंबसं गुरांकरीता थोडा चारा वाचवला. नुकसान मोठे असल्याने महसूल विभागाने त्वरित पंचनामे करुन लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.