अहमदनगर-अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडमधील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस योगेश राळेभात आणि राकेश उर्फ रॉकी अर्जुन राळेभात या दोघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. गोविंद गायकवाड आणि एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी अटक केली असून या दोघांनीच हा हल्ला केला होता. या प्रकरणी पोलिसांनी गोविंद गायकवाडसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता.
योगेश आणि राकेशवर गोळीबार करणारा गोविंद हा शिरुरजवळील मांडवगण फराटा येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली. याशिवाय या गुन्ह्यातील एका अल्पवयीन आरोपीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोघांच्या अटकेमुळे हत्येचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. भाजपा नेते आणि पालकमंत्री राम शिंदे यांचा कार्यकर्ता उल्हास माने याचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.
माने याच्या तालमीतील पहिलवानांनी ही हत्या केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला होता. माने हा पूर्वी मनसे, काँग्रेस आणि सध्या भाजपात आहे.वर्षभरापूर्वी त्याच्या तालमीतील मुलांशी फलक लावण्यावरुन योगेश व राकेशचा वाद झाला होता. यातूनच हे हत्याकांड घडल्याचे फिर्यादीत म्हटले होते.