एसटीच्या अधिकृत थांब्यावर मिळणार फक्त ३० रूपयांत नाश्ता

पुणे : एसटी महामंडळाने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. एसटीच्या प्रवाशांसाठी करार करण्यात आलेल्या खासगी हॉटेलमध्ये ३० रूपयांना नाश्ता मिळणार आहे.

एसटी महामंडळाच्या माहितीनुसार, एसटीच्या प्रवाशांसाठी करार करण्यात आलेल्या खासगी हॉटेलमध्ये शिरा, पोहे, उपमा, वडा पाव, इडली आदींपैकी एक पदार्थ आणि चहा असा नाश्ता ३० रुपयांना द्यावा लागणार आहे. परंतु त्याचे अनेक ठिकाणी पालन होत नसल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आता ३० रुपयात चहा-नाश्ता न दिल्यास हॉटेल चालक आणि अधिकृत बस थांब्यावर बस न थांबवल्यास चालक-वाहकावर कारवाई करण्यात येणार आहे.

त्याशिवाय, एसटी महामंडळाचे नाथजल छापील किंमतीपेक्षा अधिक दराने विक्री होत नाही, याची खातरजमा करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. नाथजल या मिनरल वॉटरच्या बाटलीसाठी १५ रूपये आकारण्यात येत आहे. यामध्ये विक्रेत्याने कुलिंग चार्ज अथवा इतर कारणाने छापील किंमतीपेक्षा अधिक दर आकारू नये असे आदेश महामंडळाने दिले आहेत.