नवी दिल्ली: २०१२ मध्ये दिल्लीतील सामुहिक बलात्कार प्रकरणातील दोषींची दयेची याचिका राष्ट्रपतींनी स्वीकारली नाही. त्यामुळे दोषींचा फाशीचा मार्ग मोकळा झाला आहे. उद्या २० मार्च रोजी पहाटे ५.३० वाजता फासावर लटवण्यात येणार आहे आरोपींपैकी एक असणाऱ्या पवन गुप्ताची क्युरेटीव्ह पेटीशन फेटाळून लावण्यात आली आहे. तर पवन आणि अक्षय या दोघांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केलेला दयेचा अर्ज केला होता. या दोघांनी राष्ट्रपतींकडे दुसऱ्यांदा दयेचा अर्ज केला होता. तो राष्ट्रपतींनी दाखल करून घेण्यास म्हणजेच स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यामुळे निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींना उद्या फाशी देण्यात येणार आहे.
निर्भयाच्या चारही दोषींना फासावर लटकवण्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. अक्षय ठाकूर वगळता इतर तीन दोषी पवन, विनय आणि मुकेश यांच्या कुटुंबीयांनी शेवटची भेट घेतली आहे. दोषी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुरुवारी दिवसभर न्यायालयीन कामकाज सुरु ठेवले जाऊ शकते. निर्णय येण्यासाठी रात्र होऊ शकते. पण दोषींसमोरील सर्व पर्याय संपले असल्याने फाशी रद्द होणे अशक्य आहे.