मुंबई: महाविकास आघाडीच्या सरकारचा शपथविधी होऊन १५ दिवस झाले आहे. मात्र अद्यापही खातेवाटप झालेले नाही. नागपूरच्या अधिवेशाना दरम्यान खाते वाटप होण्याची शक्यता आहे. दरम्यान महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाला मिळणाऱ्या खात्यांची माहिती समोर आली आहे. माजी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याकडे अर्थ तर कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांच्याकडे उपमुख्यमंत्रीसह गृह खाते देण्यात येणार असल्याचे वृत्त ‘इकॉनॉमिक टाईम’ने दिले आहे. अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. मात्र तीन दिवसातच त्यांनी राजीनामा दिल्याने ८० तासात भाजप सरकार कोसळले. त्यानंतर अजित पवार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार की याबाबत चर्चा सुरु आहे. मात्र त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असून त्यांच्याकडे अर्थ खात्याची मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे गृह आणि नगरविकास ही दोन्ही खाती सध्या देण्यात येणार आहेत. मंत्रिमंडळ विस्तारानंतर त्यातील गृहखाते राष्ट्रवादीकडे जाईल. एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास हे खाते कायम राहील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर हे खाते स्वतःहून मोठा विश्वास टाकला आहे. शिवाय नगरविकास हे खाते मुख्यमंत्री व्यतिरिक्त अन्य मंत्र्याकडे देण्याचा नवा पायंडा ही त्यांनी पाडला आहे.
संभाव्य खातेवाटप
शिवसेना : नगरविकास, उद्योग, उच्च व तंत्रशिक्षण, परिवहन, एमएसआरडीसी, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क, वन, पर्यावरण, सांस्कृतिक कार्य, पाणीपुरवठा, अन्न व औषधी पुरवठा, पर्यटन
राष्ट्रवादी : गृह, सहकार, वित्त, ग्रामविकास, पणन, सामाजिक न्याय, गृहनिर्माण, कृषी, सार्वजनिक आरोग्य. जलसंपदा, अल्पसंख्यांक
काँग्रेस : महसूल, ऊर्जा, आदिवासी विकास, सार्वजनिक बांधकाम, दुग्धविकास व पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण, वस्त्रोद्योग, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण. तसेच (राज्यमंत्री) सहकार, नगरविकास, गृह (ग्रामीण)